Poisoning To Students : अनोळखी व्यक्तीने दिलेल्या चॉकलेटमधून १८ विद्यार्थ्यांना विषबाधा | पुढारी

Poisoning To Students : अनोळखी व्यक्तीने दिलेल्या चॉकलेटमधून १८ विद्यार्थ्यांना विषबाधा

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : एका अनोळखी व्यक्तीने दिलेली चॉकलेट्स खाल्ल्यामुळे नागपूरच्या सीताबर्डी येथील मदनगोपाल अग्रवाल शाळेतील तब्बल १८ विद्यार्थ्यांना विषबाधा (Poisoning To Students)  झाली. शिक्षिकेच्या निदर्शनास हा प्रकार येताच तातडीने या विद्यार्थ्याना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी तिघांना खबरदारी म्हणून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने नागपूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

शाळा व्यवस्थापनाच्या मते शाळेबाहेर एका अनोळखी व्यक्तीने चॉकलेट (Poisoning To Students) वाटले. विद्यार्थ्यांनी आनंदाच्या भरात चॉकलेट खाल्ले. काही वेळातच त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. एकाचवेळी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत असल्याने शिक्षकही घाबरून गेले. तातडीने सर्वच विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Poisoning To Students  : विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास काळ्या रंगाची कार शाळेबाहेर येऊन थांबली. कारमधून तोंडावर मंकी कॅप घातलेली व्यक्ती उतरली. तिने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटली. यानंतर संबंधित व्यक्ती तिथून निघून गेली. वाटप करण्‍यात आलेली चॉकलेट्स मुलांनी खाल्ली. एक-दोन चॉकलेट्स खाल्लेल्या मुलांना फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अनोळखी व्यक्तीकडून ४ ते ५ चॉकलेट्स घेऊन खाल्लेल्या मुलांना अधिकच त्रास जाणवायला लागला. ही बाब शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर १८ मुलांना नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले. दाखल सर्व मुलांची प्रकृती उपचारानंतर स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी लता मंगेशकर रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांना चॉकलेटस वाटणारी व्यक्ती नेमकी कोण होती, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button