गंगाखेड : राष्ट्रवादीच्या जन आशीर्वाद यात्रेला गंगाखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

गंगाखेड : राष्ट्रवादीच्या जन आशीर्वाद यात्रेला गंगाखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराच्या प्रत्येक प्रभागात जाऊन शहर विकास संकल्पनेच्या व आगामी विकासाच्या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा मंगळवारी गंगाखेड शहरातील प्रभाग क्र.२ मधील डॉ. आंबेडकर नगरात पोहोचली. या जन आशीर्वाद यात्रेत माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व युवा नेते ॲड. मिथिलेश केंद्रे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रमुख नेत्यांनी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गंगाखेड शहराच्या विकास संकल्पना आणि आगामी विकासाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर शाखेने घरोघरी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांचा आशीर्वाद घेतला जात आहे. या यात्रेत माजी आ. डॉ मधुसूदन केंद्रे, त्यांचे पुत्र ॲड. मिथिलेश केंद्रे, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी होत प्रभाग क्र.१ आणि प्रभाग क्र.२ मधील नागरिकांच्या घरी भेटी दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक सुनील चौधरी, सय्यद अकबर, अजीज खान, विशाल साळवे, चंद्रकांत खंदारे, नागनाथ कासले, रसुल भाई, अनवर खान, सुरेश साळवे, साबेर भाई आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या जन आशीर्वाद यात्रेस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

 

Back to top button