सांगली: सावळज मंडलात मुसळधार पाऊस; सरासरीच्या १७५ टक्के पावसाची नोंद | पुढारी

सांगली: सावळज मंडलात मुसळधार पाऊस; सरासरीच्या १७५ टक्के पावसाची नोंद

तासगाव: पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या पावसाळ्यात सावळज मंडलातील गावांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. १० ऑक्टोबर अखेरीस सावळज मंडलात ७३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस पडणाऱ्या सरासरी पावसाच्या १७५ टक्के आहे. पावसाने अग्रणी नदी वाहती झाली आहे. मंडलातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात सावळज मंडलामध्ये पावसाने ओढ दिली होती. जून अखेरीस मंडलात २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मंडलातील सावळजसह सिध्देवाडी, डोंगरसोनी, अंजनी, नागेवाडी, वडगाव आणि लोकरेवाडी या गावामध्ये तूफान पाऊस पडलेला आहे.

जुलै महिन्यात मंडलात १९६ मिलीमीटर, ऑगस्ट महिन्यात २२६ मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्यात २०९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात १० तारखेपर्यंत पुन्हा ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठा असलेला सिध्देवाडी तलाव भरुन ओव्हरफ्लो झाला आहे. मंडलाच्या हद्दीतमध्ये अग्रणी नदी वाहती झाली आहे. मंडलातील सर्व ओढे आणि नाले भरुन वाहू लागले आहेत. सरासरीच्या १७५ टक्के पडलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असले, तरी पीकछाटणी झालेल्या द्राक्षबागा रोगाला बळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button