नांदेड : दाढीचे पैसे दिले नाहीत म्हणून सलून चालकाने ग्राहकाचा गळा चिरला | पुढारी

नांदेड : दाढीचे पैसे दिले नाहीत म्हणून सलून चालकाने ग्राहकाचा गळा चिरला

किनवट, पुढारी वृत्तसेवा  : सलूनमध्ये अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे असे म्हणत तगादा लावल्याने, झालेल्या वादात सलून चालक व ग्राहकामध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्यामुळे सलून चालकाने आपल्या जवळील धारदार शस्त्राने ग्राहकाचा गळा कापून खून केला. तर संतप्त अज्ञात जमावाने सलूनच्या मालकाचा ठेचून खून केला. तसेच सलूनचे दुकान व संबंधित सलून मालकाचे घर जाळून खाक केले. सदरील घटना बोधडी येथील बाजारपेठेत बुधवारी (दि.१५ ) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.

याबाबत अधिकची माहिती अशी की, बोधडी येथे अनिल मारुती शिंदे (वय ४०) या तरुणाचे सलून मार्केटमध्ये आहे. या सलूनमध्ये सायंकाळी पाच ते साडेपाच सुमारास याच गावात राहणारा व्यंकटी सुरेश देवकर (२२) हा तरुण दाढी करण्यासाठी गेला. दाढी करत असताना अर्धी दाढी झाल्यावर देवकरला शिंदेने दाढीचे पैसे दे म्हणून मागणी केली असता, माझी दाढी पूर्ण कर दाढी झाल्यावर पैसे देतो, असे सांगितल्याने दोघात वाद झाला.

वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि चक्क सलूनचा मालक अनिल शिंदे याने व्यंकटी देवकर याचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच देवकरच्या नातेवाईकांनी जमाव करुन प्रथम सलूनचे दुकान जाळून टाकले व नंतर अनिल शिंदे याचा शोध घेऊन त्याला गावाच्या भर मार्केटमध्ये ठेचून मारून खून केला. घटनेची माहिती प्राप्त होताच किनवट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button