

बंगळूर; वृत्तसंस्था : महाराष्ट्राचा सुपरस्टार क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने गुरुवारी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करीत शतकी खेळी केली. तो 127 चेंडूंत 108 धावा करून माघारी परतला. यात त्याने 12 चौकार व 2 षटकार खेचले. भारत 'अ' विरुद्ध न्यूझीलंड 'अ' यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली.
कर्णधार प्रियांक पांचाळ व अभिमन्यू ईश्वरन लगेच माघारी परल्यानंतर भारतीय संघाला मोठे धक्के बसले होते. पण, मधल्या फळीत आलेल्या ऋतुराजने किवी गोलंदाजांचा समाचार घेताना शतक झळकावले आणि भारताला पुन्हा मजबूत स्थितीत आणले. (Ruturaj Gaikwad)
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रियांक (5) 20 व्या षटकात बाद झाला आणि 40 धावांवर असताना भारताला पहिला धक्का बसला. पाच षटकांच्या अंतराने अभिमन्यूही 38 धावांवर बाद झाला. 2 बाद 66 अशी अवस्था असताना ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने रजत पाटीदारसह खेळपट्टीवर जम बसवला. ऋतुराज व रजत यांनी तिसर्या विकेटसाठी 45 धावा जोडताना संघाला शंभरी पार नेले.
मॅथ्यू फिशरने या डावातील दुसरी विकेट घेताना रजतला 30 धावांवर बाद केले. सर्फराज खानही खाते न उघडता फिशरच्या गोलंदाजीवर बाद झाला.पाठोपाठ दोन विकेटमुळे भारताची 4 बाद 111 अशी अवस्था झाली. पण, ऋतुराज व यष्टिरक्षक फलंदाज उपेंद्र यादव यांनी पाचव्या विकेटसाठी 134 धावांची मजबूत भागीदारी केली. जो वॉकरने ही भागीदारी संपुष्टात आणली. ऋतुराज 127 चेंडूंत 108 धावा करून माघारी परतला त्याने 12 चौकार व 2 षटकार खेचून 14 चेंडूंत 60 धावांचा पाऊस पाडला. ऋतुराज बाद झाला तेव्हा भारताच्या 5 बाद 245 धावा होत्या; परंतु त्यानंतर 293 धावांत किवींनी यजमानांचा पहिला डाव गुंडाळला. उपेंद्र यादवने 76 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 'अ'- पहिला डाव : ऋतुराज गायकवाड 108, उपेंद्र यादव 76. मॅथ्यू फिशर 4/22