Lumpy Skin Disease : लम्पी या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचे; तहसीलदार सचिन खाडे | पुढारी

Lumpy Skin Disease : लम्पी या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचे; तहसीलदार सचिन खाडे

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले.

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना व शेतकरी योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने लम्पी स्कीन रोगावरील लसीचे ४६७ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. शेतकऱ्यांनी आपल्या पशूंच्या आरोग्याची काळजी घेत पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला सहकार्य केले. लम्पी रोग रोखण्यासाठी बुस्टर डोस देण्याची गरज असून, लस उपलब्ध करण्यात आलेल्या जनावरांना गावकऱ्यांच्या मदतीने डोस देण्यात येत आहेत.

गावकऱ्यांनी परिसरातील नागरिकांना लस मिळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत आपल्या जनावरांना बुस्टर डोस दिले ‘माझा गोटा माझी जिम्मेदारी’ असे आव्हान प्रशासनाने केले असून याचे पालन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून या शिबीरामध्ये सहभाग घेतला. यावेळी गावकऱ्यांनी डोस दिल्यानंतर प्रत्येकाने आपली जनावरे फवारणी करून स्वच्छ धुतली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वेळीच बुस्टर डोस देण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आयोजक शेतकरी ग्रुप व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी..!

1) बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून
वेगळी ठेवणे.
2)कोणत्याही संभाव्या रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे.
3) रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये
एकत्रित सोडण्यास मनाई करणे
4) डास, गोचिड व तत्सम किड्यांचा बंदोबत
करणे तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषधी लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे.
5) रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग
प्रादर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांध्ये नेण्यास प्रतिबंध करणे
6) गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.
7) लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
8) जनावरांमधून माणसांमध्ये हा आजार पसरत नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी या जनावरांचे दूध वापरात आणू नये असाही सल्ला दिला जातोय.

लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?

  • या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते. लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो.
  • जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात.
  • हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात.
  • डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. पायावर तसेच कानामागे सूज येते.
  • जनावरे दूध देण्यास कमी पडतात.

Back to top button