बीड : परळी तालुक्यातील दहा गावांत ढगफुटीसदृश्य परिस्थिती | पुढारी

बीड : परळी तालुक्यातील दहा गावांत ढगफुटीसदृश्य परिस्थिती

परळी वैजनाथ : रविंद्र जोशी : गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. अतिवृष्टीमुळे शेती व पिकांना मोठी बाधा निर्माण झाली आहे. काल दि. ५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. यामध्ये परळी जवळील पांगरी, लिंबोटा, तळेगाव, या परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामध्ये प्रकारे ढगफुटी सदृश्य परिस्थिती बघायला मिळाली. या अतिवृष्टीत दहा ते बारा गावे प्रभावित झाली आहेत. शेती व पिकांना या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात बाधित केले आहे.

काल दि. ५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अवघ्या काही वेळात सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले. त्यामुळे उभी पिके संपूर्णतः पाण्यात गेल्याचे चित्र दिसून आले. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसाने शेती आणि शिवार थळथळून गेला. पांगरी लिंबूटा ,तळेगावसह परिसरातील गावांमध्ये सर्वत्र काही क्षणात पाणीच पाणी दिसून येत होते. उभ्या पिकांमधून पाणी वाहताना दिसत होते. छोट्या नदी-नाल्यासारखेच पाणी शेतांमधून वाहू लागले. यामुळे शेतातील पिके ओंबाळून निघाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

संपूर्ण पाणी शेत शिवारात वाहून गेल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. येणाऱ्या दोन-चार दिवसांत या पिकांवर या पाण्याचा किती व कसा दुष्परिणाम झाला हे दिसून येणार आहे. या परिसरातील नदी, नाले, ओढे यासह संपूर्ण शिवार जलमय झाल्याचा अनुभव या भागातील नागरिकांनी काल घेतला. या ढगफुटी सदृश्य स्थितीबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी असा पाऊस आम्ही कधीच पाहिला नाही.

महसूल विभागाकडून माहिती संकलन सुरु

याबाबत महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असता परळीचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी सांगितले की, ही वास्तव परिस्थिती आहे. पांगरी, लिंबोटा तळेगाव सह अन्य नऊ ते दहा गावे या अतिवृष्टीने प्रभावित झाली आहेत. काही वेळ ढगफुटीसारखा पाऊस असल्याने शेतीतून पाणी वाहून वाहून गेले आहे.पाण्याचा बराचसा निचरा झालेला आहे. परंतु दोन दिवसात पिकांच्या नुकसानीबाबतची माहिती समोर येईल. ज्या ठिकाणी नुकसान झाले असेल त्या ठिकाणी प्रशासन माहिती घेत आहे.

पर्जन्यमापक यंत्रणाच नाही

दरम्यान, या परिसरात तुफान अतिवृष्टी झाली. परंतु पर्जन्यमापक यंत्रणा नसल्याने नेमका किती प्रमाणात पाऊस झाला. याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. केवळ तहसील कार्यालय येथेच पर्जन्यमापक यंत्रणा आहे. त्यामुळे तालुक्यात इतरत्र अतिवृष्टी किंवा पर्जन्यमापन करायचे असल्यास पर्जन्यमापक यंत्रणाच नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. काही वर्षापूर्वी महसूल मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आली होती. मात्र काळानुरूप ती यंत्रे नादुरुस्त झाली. त्यानंतर अशी यंत्रणा पुन्हा नव्याने कार्यरत करण्यात आलेली नाही. पूर्ण तालुक्यात पर्जन्यमापन करण्यासाठी केवळ तहसील कार्यालयात असलेल्या पर्जन्यमापन यंत्रणेचाच आधार घ्यावा लागतो.

Back to top button