कोल्हापूर : भरधाव मोटारीने चार कामगारांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक, कोल्हापुरातील रिंग रोडवरील भीषण घटना | पुढारी

कोल्हापूर : भरधाव मोटारीने चार कामगारांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक, कोल्हापुरातील रिंग रोडवरील भीषण घटना

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील रिंग रोडवरील आयशोलेशन हॉस्पिटलसमोर भरधाव जाणाऱ्या आलिशान मोटारीने चिरडल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार कामगार गंभीर जखमी झाले. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. पैकी एकाची प्रकृती चिंताजनक बनली आहे. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. जखमींना तात्काळ शासकीय आणि खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वंदना भालकर, राजाबाई घेवदे, अर्चना सोळवंदे अशी त्यांची नावे आहेत. प्रकृती चिंताजनक बनलेल्या कामगाराचे नाव समजू शकले नाही. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रिंग रोड मार्गावर हॉकी स्टेडियमजवळ असलेल्या आयशलेशन हॉस्पिटल समोरील रोडवरून मोटारकार भरधाव वेगाने हॉकी स्टेडियम दिशेने जात असताना चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. यामुळे मोटार रस्ता दुभाजकावर आदळली. यावेळी दुभाजकावर झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याचे काम करत असलेल्या चार कामगारांना मोटरने चिरडले. त्यात चौघेही कामगार रस्त्यावर दूरवर फेकले गेले. त्यापैकी राजाबाई घेवदे यांच्या हाताची बोटेही तुटून पडली तर अन्य तिघांना डोक्याला हाता पायाला गंभीर इजा झाल्याने चौघानाही तातडीने खासगी वाहनातून रुग्णालयाकडे हलविण्यात आले.

सकाळी या मार्गावर दुचाकी चाकी वाहनांची पगर्दी असते. शिवाय मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धांची तोबा गर्दी असते. रिंगरोडवर भीषण घटना घडताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमाशे, सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वाहतूक शाखेचे पोलीसही घटनास्थळी आल्यानंतर वाहतूक पूर्वत करण्यात आली. जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.

Back to top button