जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किरकोळ व्यापार्‍यांकडे कल | पुढारी

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किरकोळ व्यापार्‍यांकडे कल

नवी मुंबई; राजेंद्र पाटील : केंद्र सरकारने 18 जुलैपासून जीवनाश्यक वस्तूंवर म्हणजे पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळींवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. यामुळे शहरातील नामांकित मॉलमध्येही आता किरकोळ व्यापार्‍यांप्रमाणे खुल्या पध्दतीने जीवनाश्यक वस्तूंची विक्री केली जात आहे. याबरोबर पॅॅकिंगमध्येही जीएसटीसह विक्री सुरु आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांनी आता किरकोळ व्यापार्‍यांकडून जीवनाश्यक वस्तूंची ( किरणा मालाची) खरेदी करण्याकडे आपला मार्ग वळवला आहे. यामुळे ग्राहकांना जीएसटीचा फटका बसत नसल्याचे किरकोळ व्यापारी सांगतात.

18 जुलैपासून केंद्राने जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात एपीएमसी शिखर बाजारपेठेतील व्यापारी संघटना देशव्यापी बंदमध्ये सामील झाल्या होत्या. जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळी 8 ते 12 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती एपीएमसी संचालक आणि धान्य बाजारातील घाऊक व्यापारी निलेश विरा यांनी दिली. मुंबई एपीएमसीतील धान्य आणि मसाला बाजारपेठेतील 1250 घाऊक व्यापारी आहेत. या व्यापार्‍यांकडे गहू, ज्वारी, तांदूळ आणि डाळींच्या 30 ते 40 किलोच्या पॅकिंग बॅग येतात. त्यावर पाच टक्के जीएसटी लागू होतो. यामुळे आता किरकोळ खरेदीदारांनी 25 ते 30 किलोच्या पॅॅकिंग बॅग खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यावर जीएसटी लागू होत नाही. किरकोळ व्यापारी घाऊक बाजारातील खरेदी केलेला माल हा किराणा दुकानात खुल्या पध्दतीने विक्री करतो. त्यामुळे ग्राहकांची पाच टक्के जीएसटी बचत होत असली तरी महागाईने किलोमागे 7 ते 8 रुपयांचा भुर्दंड हा सोसावा लागतो. डाळींमध्ये मॉल आणि किरकोळ दुकानातील फरक हा काही डाळींत तीन रुपये तर काही डाळींमध्ये 20 ते 50 रुपयांचा फरक आहे. जीएसटी आणि वाढत असलेली महागाई ही ग्राहकांकडूनच वसूल केली जाते. मॉलमध्येही तांदूळ, गहू, ज्वारी, साखर, साबुदाणा, शेंगदाणे, बाजरी खुल्या पध्दतीने किलोवर विक्री केली जात आहे.

Back to top button