नगर : नालेसफाईच्या नावाने बोंबाबोंब..! | पुढारी

नगर : नालेसफाईच्या नावाने बोंबाबोंब..!

नगर : पुढारी वृत्तसेवा : गुरूवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी सावेडी, बोल्हेगावसह उपनगरातील अनेक भागात नाल्यांचे पाणी घरात घुसले. यावर सदस्यांनी शुक्रवारी (दि.5) स्थायी समितीच्या सभेत अधिकार्‍यांना जाब विचारला. तर, अनेक ठिकाणी नालेसफाईत त्रूटी राहिल्याची बाब समोर आली. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले. महापालिका स्थायी समितीची सभा सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्थायी समिती सदस्य मुदस्सर शेख, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, सचिन गायकवाड, अमोल येवले, रुपाली वारे, वंदना ताठे आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक रुपाली वारे यांनी निर्मलनगर परिसरातील अभियंता कॉलनीमध्ये पावसाचे पाणी घुसल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्याच पद्धतीने बोल्हेगाव भागातही पाणी घुसल्याचे सभापती वाकळे म्हणाले. तर, रवींद्र बारस्कर यांनीही सावेडी गाव परिसरात काही घरांमध्ये पाणी घुसल्याचे सांगितले. तर, नगरसेवक वंदना ताठे यांनी वाघ मळ्यातील पुलाचा कठडा कोसळल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकार्‍यांना जाब विचारला असता ते निरूत्तर झाले.

नालेसफाईसाठी 25 लाख रुपये खर्च केला. मग, नाले तुंबले कसे? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. तर, अनेक ठिकाणी नाल्याची रुंदी कमी झाल्याने तिथे जेसीबी बसले नाही. त्यामुळे तिथे नालेसफाई राहिली होती. परिणामी त्यामुळे पाणी तुंबले आणि नागरिकांच्या घरात घुसले. हीच परिस्थिती सर्वत्र झाली. तर, अधिकारी म्हणाले, अनेकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहेत. सभापती कुमार वाकळे यांनी तत्काळ संबंधित खातेप्रमुखांनी त्या भागाची पाहणी करावी. कोणाचे अतिक्रमण असल्याच तत्काळ काढून घ्यावे, अशा सूचना दिल्या. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

जबाबदारी झटकू नका
पुराचे पाणी घरात घुसते. नागरिकांनी खड्ड्यात घर बांधल्यानंतर आपण काय करणार? सवाल उपायुक्त यशवंत डांगे यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती कुमार वाकळे म्हणाले, साहेब जबाबदारी झटकू नका. ती तुमची जबाबदारी आहे. कोणी कुठे घर बांधले. त्याला बांधकाम करताना कोणी का अडविले नाही. ही जबाबदारी पालिकेची आहे. तुमची आमची आहे. त्यामुळे तुम्ही जबाबदारी झटकू नका. त्यावर आपल्याला मार्ग काढावा लागेल.

शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने पाणी उपसा करण्यासाठी सहा पंप खरेदी केले होते. ते पंप आता प्रभाग समितीनिहाय वाटप करण्यात आले आहेत. त्यातील अवघे दोन पंप सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख शंकर मिसाळ यांनी सभेत दिली.

प्रस्ताव महासभेत पाठवा
गॅस लाईनसाठी प्रभागातील रस्ते खोदले आहेत. त्यापोटी संबंधित कंपनीने महापालिकेला रक्कम भरली आहे. ती रक्कम त्याच प्रभागातील विकासकामांवर खर्च होणे अपेक्षित आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महासभेत पाठवा आणि अशा प्रकारचा करार कंपनीने केल्यास त्याची प्रत संबंधित नगरसेवकाला देण्यात यावी, अशी सूचना सभापती कुमार वाकळे यांनी मांडली.

ओपन स्पेसवर दाखविली बौद्धवस्ती
अतिक्रमणाचा विषय निघाल्यानंतर सभापती कुमार वाकळे म्हणाले, बोल्हेगाव येथील बौद्धवस्ती नगररचना विभागाने ओपन स्पेसवर दाखविली. संबंधित प्लॉटधारकाची जागा वस्तीत घुसते अशी दाखविली आहे. त्यामुळे नगररचनाकार राम चारठाणकर यांनी तत्काळ त्याचा शोध घ्यावा. अन्यथा आम्हाला त्याची उत्तरे द्यावी लागतील. भविष्यात उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही वाकळे म्हणाले.

Back to top button