परभणी : नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास | पुढारी

परभणी : नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : चारठाणा येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सेलू तालुक्यातील ताठे सावंगी येथे पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. ताठे सांगवीपासून दोन किलोमीटर अंतरावर खैरी गाव आहे. या खैरी गावाला पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. गेल्या पंधरा वर्षापासून या करपरा नदीवर पूल बांधकाम न झाल्याने ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात करपरा नदीतून चारठाणा गावाला जाण्यासाठी रस्ता शोधावा लागतो.

निवडणुका तोंडावर आली की सर्व पक्षाचे आमदार, खासदार गावाला भेटी देत नदीवर पूल बांधण्याची आश्वासनं देऊन मोकळे होतात. देशभर आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, पण आज अनेक गावांत नदीवर पुल नाहीत. यामध्ये सावंगी गावासारखी अनेक गावांचा समावेश आहे. नदीवर पुलाचे बांधकाम झाले नसल्याने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी येऊन गावाला भेटी देतात. कोरडी आश्वासने देऊन निवडून येतात. पुन्हा पाठीमागे पाठ करून पाच वर्ष एकदासुद्धा गावांना भेटी देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास उडाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खैरी व ताठेसावंगी येथील ग्रामस्थांना दैनंदिन दळणवळणासाठी चारठाणा गाठावे लागते. परंतु, करपरा नदीला पावसाळ्यात पूर आल्यानंतर अडकून बसावे लागत आहे. दरम्यान या दोन्ही गावात फक्त पाचवीपर्यंत शिक्षण असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चारठाणा येथे यावे लागते. परंतु पावसामध्ये मात्र त्यांना शाळेला जाणे-येणे अवघड होते. अशा स्थितीत विद्यार्थी काय शिक्षण घेणार? असा प्रश्न पालक वर्गाकडून होत आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थांना चारठाणा गावाशिवाय पर्याय नसल्यामुळे नदीमधूनच वाट शोधत पुढे जावे लागेत. या करपरा नदीवरील पुलाचे बांधकाम करून शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची अडचण दूर करावी अशी मागणी खैरी व ताठे सावंगी येथील ग्रामस्थांकडून व शालेय विद्यार्थ्याकडून वारंवार होत आहे, पण लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

Back to top button