राज्यातील पहिले कृषी भवन जालन्यात | पुढारी

राज्यातील पहिले कृषी भवन जालन्यात

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकाच छताखाली कृषी विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील पहिले कृषी भवन तयार करण्याचा मान जालना जिल्ह्याला मिळाला आहे, ही निश्चितच गौरवाची बाब आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन टोपे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे होते. आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आदींसह कृषी व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, शेतकरी व नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

टोपे म्हणाले की, कृषी विभागा अंतर्गत येणारी अनेक कार्यालये सध्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना विविध कृषीविषयक कामांसाठी पायपीट करावी लागते. हे टाळण्यासाठी व शेतकर्‍यांच्या सोयीकरिता कृषी भवनाच्या माध्यमातून कृषी विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. सुमारे चौदा कोटींचे कृषी भवन व सात कोटीची अन्न व औषध प्रशासन विभागाची इमारत लवकरच शेतकरी आणि नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल. या दोन्ही इमारती जालना शहराच्या वैभवात भर पाडणार्‍या असतील.

शासन शेतकर्‍यांच्या सदैव पाठीशी आहे, असा विश्वास व्यक्त करत टोपे म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. मागील वर्षात फळबाग विमा व विविध नैसर्गिक आपत्ती विमा अंतर्गत 120 कोटी रुपयांचा विमा देण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागसुद्धा महत्त्वपूर्ण खाते आहे. या विभागाच्या माध्यमातून भेसळयुक्त अन्न व औषधी यांवर नियंत्रण ठेवले जाते. एक प्रकारे मानवजातीची सुरक्षितता या विभागावर अवलंबून आहे.

Back to top button