नांदेड : पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचा जीव लागला टांगणीला..! | पुढारी

नांदेड : पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचा जीव लागला टांगणीला..!

धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा ः जून महिना संपायची वेळ आली, तरीही पावसाचा कुठेही पत्ता नाही. वेळेच्या आत खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, तर उत्पादनात घट येते. एका बाजूला रुसलेला पाऊस, तर दुसर्‍या बाजूला खरीप पेरण्यासाठी संपत चाललेली मुदत अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकला आहे. ज्या शेतकर्‍यांनी कापूस लागवड व सोयाबीन पेरणी केली आहे. त्यांना कापसाला चुहापाणी देण्याची वेळ आली आहे.

धर्माबाद तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेती मशागतीची पूर्व तयारी पूर्ण केली असून, हवामानखात्याने या वर्षी वेळेवर पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे. मात्र, अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज पूर्ण चुकले असल्याचे दिसून येत आहे. लवकरच पाऊस पडेल या आशेने बळीराजाने शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली आहेत.

पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे, आवश्यक कीटकनाशके यांची जुळवाजुळव करून काही शेतकर्‍यांनी ठेवली आहे. यावर्षी  खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहेत. पावसाचा पत्ता नसल्याने व विविध प्रकारच्या खताच्या किमतीमध्ये वाढ झालेली असल्याने कृषी केंद्रांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नाही. अगोदरच अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकर्‍यांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यामुळे यंदाच्या खरीप पिकांचे अर्थकारण पूर्णतः बिघडण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

मृग नक्षत्राच्या हलक्या सरी अधूनमधून पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर धर्माबाद तालुक्यातील जारीकोटसह काही भागातील शेतकर्‍यांनी कापूस लागवड व पेरणी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सपाऊस बेभरवशाचा झाल्याचा अनुभव येत आहे. वेळोवेळी हवामानाबाबत केले जाणारे दावे फोल ठरत असल्याचा अनुभव येत आहे. अशा स्थितीत शेतकर्‍याने हवामानाच्या अंदाजावर भरोसा करायचा की निसर्गावर विश्वास ठेवायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात आतापर्यंत जवळपास काही शेतकर्‍यांनी कापूस लागवड व सोयाबीनची पेरणी केली आहे. दरम्यान, रोज काही वेळ पावसाळी वातावरण तयार होते. आता पाऊस नक्की येईल, असे वाटत असताना पुन्हा अपेक्षाभंग होतो. पावसाची रोज मिळणारी हुलकावणी शेतकर्‍यांना त्रस्त करीत आहे. मृग नक्षत्राची पेरणी पिकांसाठी निकोप व निरोगी असते. आतापर्यंत मृग सरी हलक्या स्वरूपात बरसल्या आणि कोरडवाहू काही शेतकर्‍यांनी लाखो किमतीचे बियाणे काळ्या आईच्या कुशीत टाकले; पण पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे

मृग नक्षत्राचा प्रारंभ होताच दोन दिवसांनंतर मृगधारा बरसल्या, परंतु पाऊस कमजोर पडल्याने उष्णतेच्या उन्हाळ्यात तप्त झालेली शेतजमीन शांत झाली नाही. त्यामुळेच आता शेतजमिनीला रिपरिप नव्हे, तर दमदार पावसाची गरज आहे. म्हणूनच एकाने म्हटल्याप्रमाणे, ‘तेलाविना गत नाही पणतीच्या वातीला अन् निसर्गाच्या पाण्याविना गत नाही या धरतीच्या मातीला’ हे तेवढेच खरे आहे. तालुक्यात यंदाच्या वर्षी सुमारे 30 हजार 400 हेक्टर क्षेत्रात खरीप पिके घेतली जाणार आहेत

Back to top button