हिंगोली : लाच घेताना गटविकास अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

हिंगोली : लाच घेताना गटविकास अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील काकडधाबा येथील एका शेतकऱ्याला विहीर व गोठा मंजुरीनंतर कार्यारंभ आदेश देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ ताब्यात घेतले.

नागनाथ तालुक्यातील काकडदाभा येथे एका शेतकऱ्याला त्याच्या वडिलांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून विहीर व गोठा मंजूर झाला होता. हे काम सुरू करण्यासाठी औंढा पंचायत समितीकडून कार्यारंभ आदेश मिळणे आवश्यक होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांच्याशी संपर्क साधला.

यावेळी खिल्लारी याने ५ हजार रुपयांची मागणी (Bribe) केली. ही रक्कम मंगळवारी देण्याचे ठरले होते. या प्रकरणात संबंधित तक्रारदार शेतकर्‍यांने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युनूस सिद्दिकी, जमादार विजय उपरे, रुद्रा कबाडे, तानाजी मुंडे, हिम्मतराव सरनाईक, राजाराम फुफाटे, सुजित देशमुख, ज्ञानेश्वर पंचलिंगे, महिला पोलीस कर्मचारी योगिता अवचार यांच्या पथकाने औंढा नागनाथ पंचायत समितीच्या परिसरात सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची रक्कम घेताच लाच लुचपतच्या पथकाने गटविकास अधिकारी खिल्लारी यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

Back to top button