परळी : पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत पाच लाखाची फसवणूक | पुढारी

परळी : पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत पाच लाखाची फसवणूक

परळी : पैशाचा पाऊस पाडून गुंतवलेली रक्कम पाच पट करून देण्याचे आमिष बाप-लेकांनी परळीतील किराणा व्यापाऱ्यास दाखवले. या आमिषाला भुलून व्यापाऱ्याने पाच लाखांची रक्कम त्यांना दिली. मात्र, त्यानंतर पैशाचा पाऊसही पडला नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळाली नाही. अखेर व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून त्या बाप-लेकावर परळीचा संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.

अंगद अंकुशराव थोरात (रा. न्यू माणिक नगर, परळी) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे किराणा दुकान आहे. थर्मलचे काम घेणारा गुत्तेदार प्रेमसागर उर्फ बाळासाहेब बापूराव जोगदंड याचा मुलगा प्रशांत याच्यासोबत अंगदची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. व्यापार वाढविण्यासाठी माझे वडील भविष्यात मदत करतील असे प्रशांतने अंगद यास सांगून विश्वासात घेतले होते. त्यानंतर एके दिवशी प्रशांतने अंगदला करोडपती करण्याचे आमिष दाखवले.

माझ्या ओळखीचे एक महाराज आहेत, ते आपल्या घरी येऊन विधी करतात, त्यांची सेवा केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यास पैशाचा पाऊस पडतो अशी बतावणी प्रशांतने केली. सोबतच, अंगदला विश्वास बसावा म्हणून मोबाईलवर पैशाचा पाऊस पडतानाचा व्हिडीओ दाखवला. तुझ्या जवळील पैशाच्या पाच पट पैसे करून दाखवतील असे आमिष त्याने दाखवले. याला प्रशांतचे वडील प्रेमसागर यानेही दुजोरा दिला.

बाप-लेकांच्या भूलथापांना भुलून मागील वर्षी दसऱ्याच्या दोन दिवस अगोदर अंगदने पाच लाख रुपये त्या बाप-लेकाकडे सुपूर्द केले. हे पैसे आम्ही महाराजांना पोचती करतो, आठ दिवसात ते तुझ्या घरी येऊन पूजा करतील आणि पैशाचा पाऊस पाडून याच्या पाच पट पैसे तुला करून देतील असे त्यांनी सांगितले. परंतु महाराज आलेच नाहीत. महाराजांना बोलवण्याबाबत अंगदनी अनेकदा जोगदंडकडे विचारणा केली, परंतु प्रत्येक वेळी ते वेगवेगळी करणे सांगत टाळत राहिले. अखेर शंका आल्याने अंगदने त्यांना महाराजाचा पत्ता आणि रक्कम दिल्याचे बँक खाते विचारले असता त्यांनी पुन्हा उडवा उडवीची उत्तरे दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रक्कम परत करण्याची मागणी करूनही आतापर्यंत जोगदंड बाप-लेकांनी त्यांचे पैसे परत केले नाहीत असा घटनाक्रम अंगद थोरात यांच्या फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून प्रेमसागर जोगदंड आणि प्रशांत जोगदंड या दोघांवर संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

Back to top button