दारू तस्करांच्या मुसक्या आवळणार! | पुढारी

दारू तस्करांच्या मुसक्या आवळणार!

कोल्हापूर; दिलीप भिसे : दारू तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने झोपडपट्टीदादा प्रतिबंधक (एमपीआयडी) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यातील तस्करांविरुद्ध कारवाईसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. कलम 39 अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘रडार’वर 105 तस्कर आहेत. ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर ओपन बारसह वाड्यावस्त्यांवरील दारू पार्ट्यांच्या प्रायोजकांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दारू तस्करांनी गोवा आणि पुणे-बंगळूर महामार्गावरील सुरक्षा यंत्रणा खिळखिळी केली आहे. पोलिस, उत्पादन शुल्कचा रात्रंदिवस फौजफाटा दिमतीला असतानाही कोल्हापूरमार्गे पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, मराठवाडा, विदर्भासाठी दारूची तस्करी होत आहे.

कोट्यवधीची उलाढाल
गतवर्षी म्हणजे कडक लॉकडाऊन आणि ठिकठिकाणी संयुक्त पथके कार्यरत असतानाही या काळातील तस्करी थक्क करणारी आहे. जानेवारी ते 26 डिसेंबर 2021 या काळात जिल्ह्यात दारू तस्करीप्रकरणी 1 हजार 801 गुन्हे दाखल झाले आहेत.

1,340 तस्करांना बेड्या
1,340 तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तब्बल 4 कोटी 17 लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठाही हस्तगत करण्यात आला आहे. 400 पसार तस्करांमागे पथकांचा ससेमिरा सुरू आहे. तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी कठोर कायद्याचा अंमल सुरू केला आहे. ‘मोका’ कारवाईच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याचा वापर सुरू केला आहे. दोन तस्करांविरुद्धचा प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यास तस्करांना अडीच ते तीन वर्षे कोठडीची हवा खावी लागणार आहे.

दीड लाखापर्यंत दंड
तस्करीप्रकरणी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेले जिल्ह्यातील 105 सराईत रेकॉर्डवर आले असून, कलम 93 अन्वये त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. संशयितांना 50 हजारांपासून दीड लाखापर्यंत दंड अथवा कारावास होऊ शकतो. या कारवाईचा प्रस्तावही जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे. ही कारवाई जानेवारीच्या पंधरवड्यापर्यंत शक्य आहे, असेही सांगण्यात आले.

15 ठिकाणी नाकाबंदी
‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या दारूची तस्करी शक्य असल्याने कागल, तिलारी, आंबोली, दाजीपूर, गगनबावडा, आंबा घाटासह 15 ठिकाणी रात्रंदिवस नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी साध्या वेशातील पथकेही नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Back to top button