कोल्हापूर : गव्याला त्याच्या घरी जाऊ द्या..! | पुढारी

कोल्हापूर : गव्याला त्याच्या घरी जाऊ द्या..!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘मी फक्त माझा कळप चुकलोय… मी जाईन माझ्या घरी, माझाही परिवार आहे. आई-वडील माझी वाट बघत आहेत. मी तुम्हाला त्रास द्यायला आलो नाही. भावांनो, मला त्रास देऊ नका,’ अशा स्वरूपाचे आवाहन आणि गव्याचे चित्र असणार्‍या पोस्टस् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आठवडाभर शहर परिसरात गव्यांचा वावर 

गेले आठवडाभर गवारेड्यांनी कोल्हापुरात ठाण मांडले आहे. वन विभाग व प्राणिमित्र संस्थांच्या पाहणीत किमान दोन गव्यांची नोंद झाली आहे. मात्र, गव्यांचा कळप विखुरला असून, तो कोल्हापूर शहराभोवती फिरत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. गुरुवारी पहाटे गवा शहरातील विवेकानंद कॉलेज, सीपीआर चौक, सोन्या मारुती चौकमार्गे पंचगंगा नदीकडे गेला. गुरुवारी दुपारी या गव्याला महामार्गावरील वाहतूक थांबवून शेतवडीच्या दिशेने वाट करून देण्यात आली.

हुल्लडबाजांमुळे बिथरण्याची भीती 

गव्याला सुरक्षितपणे त्याच्या आवासात सोडण्यासाठी वन विभाग, वन्यजीव विभाग, प्राणी मित्र संघटना, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा व महापालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा, वाहतूक पोलिस व संबंधित सर्व विभाग सक्रिय आहेत. दुसरीकडे, काही हुल्लडबाज गव्यांची छायाचित्रे घेणे, व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शांत असणारे गवे बिथरत आहेत.

जंगले समृद्ध करण्याची गरज 

वनांतील वाढता मानवी हस्तक्षेप, गवताची कमतरता, वन विभागाच्या हद्दीलगत पिकविण्यात येणारी शेती, गव्यांच्या खाण्याच्या बदललेल्या पद्धती, गव्यांची वाढती संख्या आदी कारणांमुळे गवे जंगलांतून बाहेर पडू लागले आहेत. जंगलांमधील मानवी हस्तक्षेप असाच वाढत राहिला; तर गवे गावागावांत पाहावयास मिळतील, असे बालले जाते.

आकाराने धिप्पाड गवा स्वभावाने मात्र बुजरा व भित्रा असतो. परंतु, त्याला त्रास दिल्यास तो अधिक क्रूर बनतो. गवे आता शहरातच पाहावयास मिळू लागले आहेत. सुरुवातीला एकच गवा होता; परंतु आता शहरालगतच्या गावांमध्येदेखील गवे येऊ लागले आहेत. त्यांची संख्या वाढू लागली आहे. यापूर्वीदेखील गवे शहरात येण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, एकाचवेळी अनेक गावांमध्ये गवे येण्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी.

एवढ्या मोठ्या संख्येने गवे बाहेर पडण्याची कारणे अनेक आहेत. गवत व पाण्याचा अभाव ही कारणे आहेतच; परंतु वनांमध्ये वाढता मानवी हस्तक्षेप हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ते गव्यांचे पहिले अभयारण्य आहे. गव्यांचे मुख्य खाद्य गवतच आहे. परंतु, वनांमध्ये वाढत्या झुडपांमुळे गवताचे प्रमाण कमी होऊ लागल्याचे बोलले जाते. गव्यांच्या खाण्याच्या पद्धतीदेखील बदललेल्या आहेत.

जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. परंतु, वनांमध्ये जाण्यास परवानगी नसल्यामुळे कामे केली की नाहीत, याची माहिती समोर येत नाही. दाजीपूरमध्ये पाण्याचे अनेक झरे आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असते. त्यासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये पैसा जिरविला जातो; परंतु, प्राण्यांना पाणी काही दिसत नाही. परिणामी, पाण्याच्या शोधातदेखील गवे बाहेर पडू लागले आहेत.

वनांमध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील प्राणी बाहेर येऊ लागले आहेत. वनांना लागून होणारे खणिकर्म आणि वनांच्या हद्दीलगत करण्यात येणारी शेती, यामुळे गवे वन सोडू लागल्याचे दिसते. वनांशेजारीच उसाचे, भाताचे हिरवेगार शेत दिसल्यानंतर गवे ते खाण्यासाठी बाहेर पडतात. पर्यटनाच्या नावाखाली नागरिकांचा वाढलेला वावर आणि त्यातून वनांमध्ये निर्माण होणारे प्रश्न, यामुळेच गवे नागरी वस्तीत दिसू लागले आहेत.

सोशल मीडियावरून जनजागृती 

गवा सुरक्षित आपल्या आवासात पोहोचावा यासाठीची सुज्ञ नेटकर्‍यांकडून जनजागृती केली जात आहे. वन विभाग, प्राणिमित्र व इतर यंत्रणांना त्यांचे काम शांतपणे करू द्या. नाहक गर्दी-गोंधळ करून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करू नका, असे आवाहन केले जात होते.

गवे जंगलाबाहेर येण्याची कारणे

  • गव्यांच्या खाण्याच्या पद्धतीत होत असलेला बदल
  • मानवी हस्तक्षेप वाढल्याने मूळचा बुजरा व भित्रा असणारा गवा धीट बनत आहे
  • युरियायुक्त खाद्यामुळे गवे शेतांमध्ये येत आहेत
  • शेतीसाठी वापरण्यात येणार्‍या कीटकनाशकांमुळे गंधग्रंथी कमजोर असल्यामुळे गवे भटकतात
  • मांसभक्षक प्राण्यांची संख्या कमी झाल्याने गव्यांची संख्या वाढत आहे

Back to top button