kolhapur district bank election : राष्ट्रवादीच्या जागा होणार कमी | पुढारी

kolhapur district bank election : राष्ट्रवादीच्या जागा होणार कमी

कोल्हापूर; विकास कांबळे : kolhapur district bank election : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या समझोता एक्स्प्रेसचे राजकारण आणि विद्यमान संचालक राष्ट्रवादी सोडून दुसर्‍या पक्षात गेल्यामुळे जिल्हा बँकेमध्ये सध्या सत्तेत असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळच्या निवडणुकीत काही जागांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे यावेळी बँकेतील राष्ट्रवादीच्या संचालकांची संख्या कमी होणार आहे.

kolhapur district bank election या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन जागा वाढण्याची शक्यता असली, तरी व्यक्ती मात्र त्याच राहणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक निकालापूर्वीच गगनबावड्यातून आपली निवड बिनविरोध करून घेत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. ही जागा राष्ट्रवादीची होती. त्यामुळे काँग्रेसच्या देखील जागा वाढणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ( kolhapur district bank election ) सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. निवडणूक झाल्यापासून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बँकेचे अध्यक्ष आहेत. दहा संचालक राष्ट्रवादीचे, तर सहा संचालक काँग्रेसचे आहेत. परंतु, सध्या जिल्ह्यात सहमतीचे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. विधानसभेच्या राजकारणामध्ये ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत. परंतु, जिल्ह्याच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांची अधिक जवळीक आहे. त्यामुळे समन्वयकाची भूमिका ते पार पाडत आहेत. त्याच्या बदल्यात जनसुराज्यला आणखी एखादी जागा मिळविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु, आघाडीत पक्षांची झालेली गर्दी आणि उमेदवारांची संख्या पाहता त्यांना आहे तेवढ्यावरच समाधान मानावे लागणार आहे.

शिवसेनेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्यावेळी विद्यमान संचालक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खा. निवेदिता माने राष्ट्रवादीचे उमेदवार होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. मंत्री यड्रावकर व माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दोघेही विद्यमान संचालक आहेत आणि महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे ते असल्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी लागेल, अशी चर्चा देखील सुरू आहे. शिवसेनेचे खा. संजय मंडलिक हे पूर्वीपासूनच शिवेसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेला दोन जादा जागा मिळण्याची शक्यता आहे.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे, पण सध्या भाजपसोबत असणारे आ. प्रकाश आवाडे यांना देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांनी सोबत घेतले आहे. त्यांनी आपली उमेदवारीदेखील जाहीर केली आहे. पतसंस्था व नागरी बँका गटात भारतीय जनता पक्षाचे अनिल पाटील विद्यमान संचालक आहेत. आता या गटातून आ. आवाडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली, तरी ही जागा भाजपचीच असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दोन दिवसांत चर्चा होणार आहे.

चराटींना उमेदवारी मिळणार की पुन्हा बंडखोरी?

बँकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून अशोक चराटी निवडून आले. परंतु, नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना आघाडीतून अधिकृत उमेदवारी मिळणार की पुन्हा बंडखोरी करावी लागणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button