अवकाळी पाऊस : राज्यात शेतीचे प्रचंड नुकसान | पुढारी

अवकाळी पाऊस : राज्यात शेतीचे प्रचंड नुकसान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने ( अवकाळी पाऊस ) हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके तर हिरावली गेलीच आहेत. पुणे, धुळे, सातारा, नगर आदी जिल्ह्यांत शेकडोंच्या संख्येने शेळ्या, मेंढ्या आणि दुभती जनावरेही दगावली आहेत. फळबागा आणि फूलशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. ऊस तोडण्या खोळंबल्या असून ऊस पीक भुईसपाट झाले आहे. पावसाने ( अवकाळी पाऊस ) द्राक्षे, भात, भाजीपाला, काढणीला आलेला कापूस, तूर, मिरची, कांदा, हरभरा आणि फळ पिकांचे न भरून येणारे नुकसान केले आहे.

सांगली जिल्ह्यात पावसाचा फटका ( अवकाळी पाऊस )

सांगली : सांगली शहरासह सर्वच तालुक्यांत बुधवारी व गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेती, घरे, व्यवसाय अशा सर्वच घटकांना फटका बसला आहे. जोरदार वार्‍याच्या तडाख्याने उभे पिके आडवी झाली आहेत. जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब आणि ऊस पिकाला मोठा फटका बसला असून ऊस तोडण्या खोळंबल्या आहेत.

सिंधुदुर्गात आंबा, काजूच्या मोहोरावर परिणाम ( अवकाळी पाऊस )

कणकवली : बुधवारी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ती गुरुवारी सायंकाळपर्यंत संततधार कायम होती. ऐन हिवाळ्यात पडणार्‍या या पावसामुळे आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला आहे. खरीप हंगामातील सुगीची कामेही खोळंबली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि आंध्र किनारपट्टीवर घोंघावणार्‍या जोवाड वादळामुळे पावसाचा जोर वाढला असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

रत्नागिरीत काही भागात पाऊस ( अवकाळी पाऊस )

रत्नागिरी ः जिल्ह्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास काही भागात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी मात्र मळभयुक्त वातावरणात बदल होऊन सूर्यदर्शन झाले. अवकाळी पावसाचे सावट जिल्ह्यावर कायम आहे. हे वातावरण आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात फळबागांचे मोठे नुकसान

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शेत पिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे; तर कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याला या पावसाने धडकीच भरली आहे.

मराठवाड्यात अनेक पिके धोक्यात

औरंगाबाद ः औरंगबादसह मराठवाड्यात सलग दुसर्‍या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी सुरूच आहे. यामुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने चिंता वाढली आहे. डाळिंब, मोसंबी, तूर, कांदा, मका, कापूस पिकांना धोका वाढला आहे.

बेळगावला झोडपले

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याला गुरुवारी अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले. पावसामुळे विक्रेते, व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या पंधरा दिवसांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने याचा फटका शेती पिकांना बसला आहे.

पावसामुळे सागरी पर्यटनाला ब्रेक

मालवण : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह पावसाने जोर धरल्याने गेले अनेक दिवस सुरू असलेल्या सागरी पर्यटनावर परिणाम झाला आहे. पर्यटनाला ब्रेक लागल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Back to top button