सर्वसामान्यांची प्रगती हाच माझा संकल्पनामा : शाहू महाराज | पुढारी

सर्वसामान्यांची प्रगती हाच माझा संकल्पनामा : शाहू महाराज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी आपला संकल्पनामा जाहीर केला आहे. सर्वसामान्यांची प्रगती हाच माझा संकल्पानामा असल्याचे त्यांनी सांगितले.

असा आहे संकल्पनामा : खासदार झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क कार्यालय सुरू करणार. प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयात पूर्वकल्पना देऊन लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य कार्यालयातील यंत्रणा अधिक सक्षम करणार. नैसर्गिक साधने व पर्यावरण संवर्धन, पंचगंगा व अन्य नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी संपूर्ण देशाला पथदर्शी ठरेल, असा उपक्रम राबवणार. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढून खोलीकरण करणार. रंकाळा तलावासह जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न, जमिनीमधील पाणीसाठा वाढविण्यासाठी भूजल पुनर्भरण मोहीम, पश्चिम घाट (सह्याद्री) परिसरातील जंगल आणि जैव विविधता संवर्धन, हवा प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न, त्या माध्यमातून ग्रीन पार्क, व्हर्टिकल गार्डन, एअर प्युरिफिकेशन सिस्टीम, मिस्ट टाईप फाऊंटन उभे करणार. मध आणि अन्य वन उत्पादनावर प्रक्रिया करणार्‍या हरित उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न, स्वच्छता आणि आरोग्य यासाठी कचरा, मैला व सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थेचे सक्षमीकरण करणार.

जिल्ह्याला देशाच्या नकाशावर महत्त्वाचा धार्मिक पर्यटन जिल्हा म्हणून आणण्याचा प्रयत्न. जिल्ह्यातील सांस्कृतिक उत्सव आणि परंपरा यांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी आणि सुविधा उपलब्ध करून देणार. किल्ले आणि वारसास्थळांचे जतन करण्यासाठी योग्य नियोजन करणार. कृषी पर्यटन आणि पर्यटन पूरक व्यवसायास संधी, जिल्हातील अंतर्गत वाहतूक, पार्किंग, सिग्नल आणि सुरक्षा प्रणाली विकसित करण्यासाठी प्रयत्न. कोल्हापूर हे संपर्काचे मध्यवर्ती ठिकाण (कम्युनिकेशन हब) व्हावे यासाठी रस्ते, घाट मार्ग, राष्ट्रीय व राज्य मार्गांनी बंदर आणि देशाला जोडण्यासाठी प्रयत्न करणार.

कोकण रेल्वेसह इतर रेल्वे मार्ग अन्य भागाला जोडणारे पर्यटन नेटवर्क तयार करण्यासाठी प्रयत्न, कोल्हापूर रेल्वेस्थानक अद्ययावत करून मॉडेल रेल्वे स्थानक होण्यासाठी प्रयत्न. जिल्हा अंतर्गत रस्त्यांचा सातत्याने विकास, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारे डे-नाईट लँडिंग तसेच नागरी आणि कार्गो सेवा देणारे विमानतळ विकसित करण्यासाठी प्रयत्न. पासपोर्ट कार्यालयाचे आधुनिकीकरण, देशातील प्रमुख शहरे आणि बिझनेस हबशी कनेक्टिव्हिटी वाढविणार. पाणी व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करणार. जिल्ह्याच्या विविध भागात नेचर पार्क, ऑडिटोरिअम, अ‍ॅम्पी थिएटर उभे करणार. शैक्षणिक सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार.

पुरासारख्या आपत्तीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने आराखडा तयार करणार. शाश्वत शेती आणि शेतीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया व पॅकिंग व्यवसाय विकासासाठी प्रयत्न, गूळ क्लस्टर, काजू उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न, अल्पभूधारक शेतकर्‍यांचे प्रश्न, शेतमालाला हमी भाव, उत्पादन खर्चाचे प्रश्न, कर्जे, पंप आणि साधने, नियमित वीज पुरवठा आदी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. तालुका क्षेत्रात क्रीडांगण विकासासह प्रशिक्षण केंद्राची निर्मिती, खेळाडूंना विशेष प्रावीण्यानंतर शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळण्यासाठी प्रयत्न, आयटी क्षेत्रासाठी आवश्यक पाठबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. युवा पिढीला व्यावसायिक नोकरी संधींसाठी तयार करणार.

महिलानिर्मित उत्पादनांना राज्यात व देशात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न. तरुणींना शिक्षणाची संधी, कौशल्यावर आधारित शिक्षण, प्रशिक्षणासाठी प्रयत्न, महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा व महिला सुरक्षेला प्राधान्य, कर्मचारी आणि दिव्यांग कर्मचार्‍यांच्या पेन्शनसह इतर प्रश्नांबाबत प्रयत्न. कर्मचार्‍यांना आयकरपात्र रकमेतून सूट मर्यादेची पुनर्मांडणी करण्यासाठी आग्रही. बेघरांना घर, धरणग्रस्तांचे पूर्ण पुनर्वसन यासाठी आग्रही राहणार.

पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रदूषण व गळतीरहित व्यवस्था. ग्रामीण भागात रोग निदानासाठी अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न.

Back to top button