महाविकास आघाडीची उद्या शिव-शाहू निर्धार सभा | पुढारी

महाविकास आघाडीची उद्या शिव-शाहू निर्धार सभा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 1) होणार्‍या शिव-शाहू निर्धार सभेची जोरदार तयारी सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे राज्यातील अनेक प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. सभेसाठी मोठी गर्दी करण्याचे नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने सुरू आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

बुधवारी गांधी मैदान येथे सायंकाळी 5 वाजता सभेस सुरुवात होणार आहे. सभेसाठी पवार, ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह आदी इंडिया आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

सभेच्या नियोजनासाठी सोमवारी सकाळी बैठक झाली. गेले वीस-पंचवीस दिवस आपण सर्वजण प्रचारात आहोत. आता विरोधकांनी अफवा पसरविण्याचे काम सुरू केले आहे. त्याची फारशी दखल घेऊ नका. मात्र येणार्‍या काळात सर्वांनी दक्ष राहून काम करणे आवश्यक आहे. सभेची माहिती आपापल्या भागात देऊन सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांना आणण्याचे नियोजन करावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी बैठकीत केले.

सभेच्या नियोजनासाठी स्वतंत्रपणे समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यानुसार समितीने आपल्या जबाबदारी पार पाडावी व ही सभा यशस्वी करावी, असे आवाहन मालोजीराजे यांनी केले.

दरम्यान, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे यांनी सभेच्या ठिकाणी भेट देऊन तयारीची पाहणी केली. पार्किंग व्यवस्था, लोकांची बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींबाबत त्यानी सूचना केल्या.

पवार, उद्धव ठाकरे, योगी आदित्यनाथ उद्या इचलकरंजीत

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ एक मे रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इचलकरंजी शहरात येत आहेत. महाविकास आघाडीची सभा सायंकाळी 5 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक येथे तर योगी आदित्यनाथ यांची सभा सायंकाळी 5 वाजता थोरात चौक येथे होणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, आ. जयंत पाटील, आ. सतेज पाटील आदींच्या उपस्थितीत सभा होणार आहे. या सभेसाठी 50 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर सहानुभूतीची लाट मतदारसंघात आहे. माजी खा. राजू शेट्टी आणि विद्यमान खा. धैर्यशील माने यांनी इचलकरंजीच्या पाणी आणि वस्त्रोद्योगासह मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात संतापाची लाट असल्याचेही बावचकर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, राहुल खंजिरे, महादेव गौड, उदयसिंग पाटील, विनय महाजन, वैभव उगळे, सदा मलाबादे आदी उपस्थित होते.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी महायुतीसह घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बैठकीस जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, अशोकराव माने, रवी गोंदकर, अनिल डाळ्या, भाऊसो आवळे आदी उपस्थित होते.

Back to top button