जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ : मुख्यमंत्री शिंदे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. परंपरेने हा समाज आमच्या महायुतीच्या पाठीशी आहे. जैन समाजाच्या विकासासाठी हे सरकार नेहमीच कटिबद्ध राहील. जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय सरकार घेईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने रविवारी आयोजित केलेल्या ‘जैन जागृती अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हॉकी स्टेडियमसमोरील कॉलनीत हा कार्यक्रम झाला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, व्यापारी उद्योजकांना कोणत्याही अडचणी आल्यास तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करा. कोणतीही अडचण तुम्हाला भासू देणार नाही. राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरच्या विकासात जैन समाजाचे योगदान मोठे आहे. महायुती सरकार नेहमीच जैन समाजाच्या पाठीशी उभे राहील. अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी कर्जफेड करणार्‍या अल्पभूधारक 16 हजार शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नसल्याची माहिती गांधी यांनी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना तातडीने निर्देश दिले. यावेळी नरेंद्र ओसवाल, कांतीलाल ओसवाल, राजेंद्र ओसवाल, जवाहर गांधी, अमृत शहा उपस्थित होते.

Back to top button