कोल्हापूर: कवठेगुलंद येथील हॉटेल वेटरचा खून झाल्याची अफवा; पोलीस प्रशासनाची तारांबळ  | पुढारी

कोल्हापूर: कवठेगुलंद येथील हॉटेल वेटरचा खून झाल्याची अफवा; पोलीस प्रशासनाची तारांबळ 

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : कवठेगुलंद (ता.शिरोळ) येथील हॉटेलमधील वेटरचा खून झाल्याची अफवा पसरली होती. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले असता हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांनीही तो दारू पिऊन फिरत होता. मिळेल तिथे काम करत होता. त्याचा खून कोण कशाला करेल, असा दुजोरा दिल्याने वेटरच्या खूनाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आणि पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, वेटरचा खून झाल्याची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

कवठेगुलंद येथील माळभाग येथे रविवारी (दि. २१) रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ झेरॉक्स सेंटरच्या कट्ट्यावर हॉटेल समाधान येथे वेटर काम करणारा सतीश कृष्णात मगदूम (वय ३६, रा. सांगाव, ता. कागल) हा निपचित पडल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्याचा कोणीतरी खून करून मृतदेह ठेवल्याची काही क्षणात अफवा सुरू झाली. ही अफवा गणेशवाडीपासून ते औरवाडपर्यंत पसरली. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढून खुनाचे वेगवेगळे तर्क लावायला सुरवात झाली.

ही वार्ता कुरुंदवाड पोलिसांना समजताच पोलीस प्रशासन फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्याला सुरवात झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरूवात झाली. मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. तो कवठेगुलंद येथील हॉटेल समाधान येथे वेटर काम करत असल्याचे समजल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाला बोलवून घेऊन नातेवाईकांना बोलविण्यात आले. नातेवाईकांनी तो दारू पिऊन फिरत होता. मिळेल तेथे काम करत होता. त्याचा खून कोण करेल, असे सांगत असतानाच वैद्यकीय अहवालातून हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आणि पोलीस प्रशासनाने आपली गतिमान केलेली तपासाची चक्रे थांबवत सुटकेचा निश्वास सोडला.

हेही वाचा 

Back to top button