प्रेमसंबंधातून अंबप येथे तरुणाचा खून | पुढारी

प्रेमसंबंधातून अंबप येथे तरुणाचा खून

किणी, पुढारी वृत्तसेवा : पत्नीशी असलेल्या जुन्या प्रेमसंबंधाच्या रागातून झालेल्या वादात कुर्‍हाडीचे घाव घालत आमिर करीम मुल्ला (वय 29 , रा. अंबप, ता. हातकणंगले) या तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना दुपारी बाराच्या सुमारास अंबप येथे घडली. या प्रकरणातील संशयित कुमार ऊर्फ खंडू वाघमोडे याला वडगाव पोलिसांनी दोन तासांतच ताब्यात घेतले.

वडगाव पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अंबप येथे करीम हमदुल मुल्ला याचे मटण शॉप आहे. करीम व त्याचा मुलगा आमिर हे दोघे शॉप चालवत होते. जवळच संशयित कुमार वाघमोडे राहण्यास आहे. यामुळे ओळखीतून संशयिताच्या पत्नीसोबत आमिरचे प्रेमसंबंध जुळले होते. दोन वर्षांपूर्वी हे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने बैठक घेऊन यापुढे कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, अशी समज देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. मात्र त्यानंतरही हे प्रेमसंबंध सुरूच असल्याची कुणकुण संशयित वाघमोडे याला लागली होती. यावेळीही त्याने आमिरला समजावले होते. मात्र आमिरने याकडे दुर्लक्ष केले होते.

शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आमिर व त्याचा मित्र संदीप वाघमोडे बकरे आणण्यासाठी कापशी पाणंदकडे गेले होते. परत येत असताना त्याच रस्त्यावर खंडू वाघमोडे बकरी चारत होता. यावेळी दोघांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात खंडूने हातात असणार्‍या धारदार कुर्‍हाडीने आमिरच्या मानेवर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने आमिर जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही घटना सोबत असणार्‍या संदीप याने आमिरच्या वडिलांना कळवली. तातडीने आमिरचे वडील व पत्नी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत आमिरला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच आमिर मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, ही घटना कळताच वडगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील, उपनिरीक्षक गिरीश शिंदे, लक्ष्मण सरगर, श्रीकांत दाभोळकर, मिलिंद टेळी, प्रमोद चव्हाण, महेश गायकवाड, जितेंद्र पाटील, आशिष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताच्या शोधासाठी दोन पथके तयार करून ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली. पोलिसांनी संशयिताच्या भावाच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मोबाईल लोकेशन मिळाल्याने तो डोंगरात असल्याची खात्री झाली. त्याचा माग काढत असताना संशयित कासारवाडी येथील डोंगरावर जात असल्याचे दिसले. पथकाने त्याला शिताफीने पकडले.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करत आहेत. आमिर याच्या मागे पत्नी, सहावर्षीय मुलगी व पाचवर्षीय मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.

Back to top button