कोल्‍हापूर : करवीर पोलिसांकडून विदेशी दारू, कारसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत | पुढारी

कोल्‍हापूर : करवीर पोलिसांकडून विदेशी दारू, कारसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबेवाडी हद्दीत वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारू बाटल्या व मारुती इको कार असा एकूण ५ लाख ७० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल करवीर पोलिसांनी हस्तगत केला आहे. पांडुरंग धोंडीराम पाडेकर (वय ५८) रा. पाटील गल्ली, निवडे, घोटावडे, ता. पन्हाळा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू आहे. या दरम्‍यान कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वडणगे फाटा येथे आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर ते केर्ली रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या इको कार क्र. एमएच ०९ ईजी १७६६ मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याचे समजले.

या माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी आंबेवाडी येथील शेतकरी संघांच्या पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या दिशेने संशयित गाडी जात असताना पोलिसांनी ती अडवली. गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये मागील बाजूस वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. बिगर परवाना, बेकायदा विक्री करण्याच्या दृष्टीने आणलेल्या दारूच्या बाटल्यांसह मुद्देमाल शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास करवीर पोलिसांनी आंबेवाडी येथे हस्तगत केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करवीर पोलिसांत सुरू होती.

१ लाख ७० हजार २१० रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूसह ४ लाख रुपयांची इको व्हॅन करवीर पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमलदार सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय कळसकर, रणजीत पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, योगेश शिंदे, अमित जाधव, विजय पाटील, धनाजी बरगे यांनी कारवाई केली.

Back to top button