चौरंगी लढतीत बाजी कुणाची ? | पुढारी

चौरंगी लढतीत बाजी कुणाची ?

चंद्रशेखर माताडे

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी देऊन निष्ठावंताचा सन्मान केला आहे. आता हातकणंगलेत विद्यमान खासदार शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरुडकर व वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यात चौरंगी लढत होईल. ठाकरे शिवसेनेने शेट्टी यांना पाठिंबा नाकारला आहे. राहुल आवाडे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. या लढतीत बाजी कोण मारणार, याचीच चर्चा आता आहे. गेल्या वेळी तिरंगी लढतीचा फटका राजू शेट्टी यांना बसला होता.

या मतदारसंघाने नेहमीच धक्कादायक निकाल दिले आहेत. 1977 च्या जनता लाटेत बाळासाहेब माने यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला. तर 2004 साली तत्कालीन खासदार निवेदिता माने यांना पराभूत करून राजू शेट्टी यांनी विजय मिळविला. 2019 मध्ये राजू शेट्टी यांना शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी पराभूत केले. आता ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची उमेदवारी बदलणार, याची चर्चा रंगली. अचानकपणे त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचेही नाव चर्चेत आले. मात्र, या सर्व बातम्या विपर्यास्त असल्याचे सांगून धैर्यशील माने यांनी त्याचे खंडन केले.

निकाल बदलणारा वंचित

गेल्यावेळी या मतदार संघाचा निकाल बदलणार्‍या वंचित बहुजन आघाडीने यंदा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याच मतदार संघाने राजू शेट्टी यांना पराभूत केले. आता शेट्टी परत नशीब आजमावत आहेत. शेट्टी यांना आता परत शिवारातून संसदेत पाठवायचे का? हे मतदारच ठरवतील.

एकाच घराण्यातील तीन खासदार

बाळासाहेब माने, निवेदिता माने व धैर्यशील माने असे माने घराण्यातील तीन पिढ्यांचे वारसदार याच मतदार संघाने संसदेत पाठविले. आता माने पुन्हा नशीब आजमावत आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या माने यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला. तसेच उमेदवारी मिळाल्यानंतरही त्यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित करणार्‍या बातम्यांनी त्यांना हैराण केले.

वडील व मुलगा दोघेही शिवसेनेचे आमदार

शिवसेनेकडून राजू शेट्टी यांना विनाअट पाठिंब्याची अपेक्षा होती. तसे देण्यास राज्यातील नेत्यांचा विरोध होता. शेवटी शिवसेनेने शेट्टी यांना मशाल हाती घेण्याची विनंती केली. मात्र, शेट्टी यांनी नकार देताच ठाकरे शिवसेनेने सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी दिली. सरुडकर हे शिवसेनेचे निष्ठावंत घराणे आहे. त्यांचे वडील बाबासाहेब पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. जिल्ह्याचे नेतृत्व उदयसिंहराव गायकवाड यांच्याकडे होते, तेव्हा ते त्यांचे घनिष्ठ होते. मात्र, एका वळणावर त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि बाबासाहेबांनी शिवसेनेच्या तिकिटावर थेट गायकवाड यांना त्यांच्याच मतदार संघात आव्हान देऊन आमदार होऊन दाखविले. यापूर्वी 1980 साली गायकवाड खासदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या जागेवर बाबासाहेब यांना आमदर म्हणून संधी दिली होती. 1980 साली काँग्रेस, तर 1990 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर बाबासाहेब विजयी झाले.

विजय-पराभवाचा सामना

पुढे त्यांचेच चिरंजीव सत्यजित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषदेतून थेट विधानसभेपर्यंत मजल मारली. 2004 च्या निवडणुकीत सत्यजित पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळविला. 2009 च्या निवडणुकीत ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांच्याकडून पराभूत झाले. नव्याने आकाराला आलेल्या मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला, तरी त्यांनी 2014 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढत विनय कोरे यांना पराभूत केले. ही निवडणूक एवढी अटीतटीची झाली, की कोरे यांचा पाटील यांनी केवळ 388 मतांनी पराभव केला. कोरे यांना 74 हजार 314, तर पाटील यांना 74 हजार 702 मते मिळाली. त्यानंतरच्या निवडणुकीत विनय कोरे विजयी झाले.

समसमान पक्ष बलाबल

आता या मतदार संघातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा हे मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. तर इचलकरंजी, शिरोळ व पन्हाळा- शाहूवाडी हे मतदारसंघ महायुतीकडे आहेत.

‘वंचित’ महत्त्वाचा घटक

चौरंगी लढतीचा फटका कोणाला बसणार, यावरच येथील निकाल अवलंबून असेल. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 1 लाख 23 हजार 151 मते घेतली होती. त्याचा फटका शेट्टी यांना बसून ते पराभूत झाले. तेव्हा विजयी शिवसेनेचे धैर्यशील माने यांना 5 लाख 82 हजार 776, राजू शेट्टी यांना 4 लाख 87 हजार 276 मते मिळाली होती. वंचितकडून अस्लम सय्यद यांनी निवडणूक लढविली होती. आता ‘वंचित’ने डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राहुल आवाडे यांची भूमिका काय, याकडे लक्ष आहे.

अशी आहे राजकीय ताकद

इचलकरंजीत भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर अशोक स्वामी, शिंदे शिवसेनेचे रवींद्र माने, शिंदे शिवसेनेचे विठ्ठल चोपडे, काँग्रेसचे शशांक बावचकर, शरद पवार काँग्रेसचे मदन कारंडे, ठाकरे शिवसेनेचे महादेव गौड व सयाजी चव्हाण हे कार्यरत आहेत. सरुडकर शाहूवाडी पन्हाळ्याचे उमेदवार असल्याने तेथे त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल. तसेच तेथे राजू शेट्टी यांचेही सहानुभूतीदार आहेत. येथे धैर्यशील माने यांना विनय कोरे यांची मदतच मोलाची ठरणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर महायुतीकडे असतील, तसेच गोकुळचे संचालक अमर पाटील व करणसिंह गायकवाड हे कोरे समर्थक असले, तरी सतेज पाटील यांनी घेतलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित होते.

शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील ठाकरे शिवसेना, दत्त सहकार समूहाचे गणपतराव पाटील काँग्रेस, विक्रमसिंह जगदाळे राष्ट्रवादी शरद पवार गट, हे महाविकास आघाडीकडे, तर आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे शिवसेना, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, माधवराव घाटगे यांची ताकद महायुतीमागे असेल.

हातकणंगलेत काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे व ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शरद पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव आवळे, तर भाजपकडून महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने कार्यरत असतील. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. जयंत पाटील, अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, भाजपचे राहुल महाडिक, निशिकांत पाटील, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, शिंदे शिवसेनचे गौरव नायकवडी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, तर शिराळ्यात शरद पवार राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक अशी राजकीय ताकद आहे.

Back to top button