कोल्हापूर : तळसंदेत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरांनवर हल्ला | पुढारी

कोल्हापूर : तळसंदेत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरांनवर हल्ला

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे आज (दि. ३१) भटक्या कुत्र्याने ज्येष्ठ नागरिकासह एका महिलेला चावा घेतला तसेच गोठ्यातील दोन गायींना चावून जखमी केले. यामुळे नागरिकांच्यात घबराट पसरली होती. भटक्या कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत होती.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न शहराबरोबर ग्रामीण भागातील दिवसेंदिवस अधिकच होत चालला आहे. अनेक ठिकाणी या कुत्र्यांची टोळकी रस्त्याला फिरताना दिसतात. तळसंदे येथे रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पारगावच्या रस्ताच्या दिशेने पिसाळलेला कुत्रा धावत आला शामराव पाटील शिक्षण समूहाजवळ दिनकर कुंभार यांना चार ते पाच ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. तसेच पुढे पुन्हा एसटी स्टँड परिसरात माजी सरपंच राजाक्का लोहार यांच्या पायाला चावा घेतला तर तळसंदे हायस्कूलजवळून पुढे चावरे फाट्याजवळ गजानन मोहिते यांच्या गोठ्यातील दोन गायींच्या तोंडाला व कानाला चावून जखमी केले. यानंतर या कुत्र्याने वाठारच्या रस्त्याकडे धाव घेतली.

यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने गावात दोघांना चावा घेतल्याने नागरिकांच्यात घबराट पसरली. तरुणांनी त्याची शोधाशोध केली. भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत होती. यावेळी भटक्या कुत्र्यांना शोधून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येईल व पाळीव कुत्र्यांचे मालकांनी लसीकरण करून घ्यावे अन्यथा ग्रामपंचायतीच्यावतीने कारवाई करण्यात येईल असे सरपंच महेश कुंभार यांनी स्पष्ट केले.

Back to top button