Lok Sabha Elections 2024 : कागलमधील कट्टर विरोधक एकत्र | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : कागलमधील कट्टर विरोधक एकत्र

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कागलमधील कट्टर विरोधक म्हणून ओळखण्यात येणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे समरजित घाटगे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी तीन तास बंद खोलीत चर्चा केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तो चर्चेचा विषय बनला आहे. (Lok Sabha Elections 2024)

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मार्केट यार्डमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने कागलचे टोकाचे विरोधक एका व्यासपीठावर आले होते. कागलमधील राजकारण पूर्वीपासून पक्षापेक्षा गटा-तटावरच अधिक चालते. पूर्वी मंडलिक व घाटगे असे दोन गट होते. त्यानंतर मंडलिक यांच्यापासून फारकत घेतल्यामुळे मुश्रीफ गट अस्तित्वात आला. घाटगे गटामध्ये देखील असेच झाले. संजय घाटगे यांनी आपला स्वतंत्र गट तयार केला. निवडणुका आल्या की हे गट जागृत होतात आणि अधिक त्वेषाने कामाला लागतात. निवडणुका झाल्या की मात्र गटाचे नेते आणि कार्यकर्ते देखील शांत होत असतात. नेते आपापल्या मार्गाने वाटचाल सुरू ठेवतात आणि कार्यकर्तेही आपापल्या कामात गुंतत होते. (Lok Sabha Elections 2024)

समरजित घाटगे गट मात्र याला अपवाद ठरला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात लढत झाली. प्रथमच निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेले घाटगे यांनी चांगलीच लढत दिली. पराभव झाल्यानंतर मतदारांनी दिलेला कौल स्वीकारत समरजित घाटगे दुसर्‍या दिवसापासून कामाला लागले. गेल्या पाच वर्षांत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सतत ते चर्चेत राहिले. मुश्रीफ व घाटगे यांच्यातील कलगीतुरा सुरूच राहिला. मुश्रीफ भाजपसोबत आले तरी समरजित घाटगे यांनी त्यांच्याबद्दली आपली भूमिका कायम ठेवली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र सध्या हे दोघे एका व्यासपीठावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे व खा. संजय मंडलिक यांनी बंद खोलीत तीन तास चर्चा केली. (Lok Sabha Elections 2024)

Back to top button