Lok Sabha Election 2024 : शाहू महाराजांना साथ द्या : संभाजीराजे | पुढारी

Lok Sabha Election 2024 : शाहू महाराजांना साथ द्या : संभाजीराजे

गगनबावडा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती घराणे शब्दाला जागणारे आहे. लोकांची काळजी घेणारे आहे. खर्‍या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचविण्यासाठी शाहू महाराजांना साथ द्या, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत गगनबावडा तालुक्यात आयोजित दौर्‍यात ते बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, आपल्या समाजात एकमेकाला आधार देण्याची संस्कृती आहे; पण सध्या भारताचे संविधान धोक्यात आले असून, देशात गढूळ झालेले वातावरण सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने शाहू महाराजांना पाठबळ द्यावे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, सामान्य माणसाला आधार देण्याचे काम आजपर्यंत छत्रपती कुटुंबाने केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खर्‍या अर्थाने रयतेच राज्य आणले. या कर्तृत्वान राजाने सामान्य माणसाला जो न्याय दिला त्याची परतफेड करण्याची संधी आपणाला मिळाली आहे. छत्रपती शाहू महाराजांना उच्चांकी मताने निवडून देऊन त्यांचा सन्मान करूया व गगनबावड्याची ताकद दाखवून देऊया.

तालुक्यातील खडुळे येथून दौर्‍यास सुरुवात झाली. गावोगावी छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील यांचे महिलांनी औक्षण करून उत्साहात स्वागत केले. या दौर्‍याप्रसंगी जि. प. माजी अध्यक्ष बजरंग पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बयाजी शेळके, माजी जि. प. सदस्य भगवान पाटील, संभाजी पाटणकर, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button