मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव खारगे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा | पुढारी

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव खारगे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी शुक्रवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी खारगे यांनी डॉ. जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

मूळचे इचलकरंजीचे असलेले खारगे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडून सुरू असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस, टाऊन हॉल येथील कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, चंद्रकांत मांडरे कलादालन, पुराभिलेखागार विभागाला भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. यानंतर त्यांनी दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयात डॉ. जाधव यांची भेट घेतली.

शालेय जीवनापासून दैनिक ‘पुढारी’चा वाचक असल्याचे आवर्जून सांगतानाच आजही आपल्या कुटुंबात वर्तमानपत्र म्हणजे ‘पुढारी’ असेच म्हटले जात असल्याचेही त्यांनी सांगत आपल्या जडणघडणीबाबतच्या आठवणी सांगितल्या. सियाचीनमध्ये सैनिकांसाठी उभारलेले हॉस्पिटल, यापेक्षा आणखी मोठी समाजसेवा कोणती असू शकते, अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यांनी डॉ. जाधव यांच्याशी जिल्ह्याची सांस्कृतिक, सामजिक परंपरा आदींसह युगपुरुष छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार असलेली भवानी तलवार, वाघनख्या आदींबाबतही चर्चा केली.

दैनिक पुढारी परिवाराच्या वतीने डॉ. जाधव यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा, शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे उपस्थित होते.

Back to top button