Kolhapur Lok Sabha Election : महायुतीचा कोल्हापूरमधील उमेदवार ठरला! विद्यमान खासदारांनीच दिली माहिती | पुढारी

Kolhapur Lok Sabha Election : महायुतीचा कोल्हापूरमधील उमेदवार ठरला! विद्यमान खासदारांनीच दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत; परंतु, अद्याप उमेदवार जाहीर कर‍ण्यात आलेला नाही. कोल्हापूरमधून खासदार संजय मंडलिक पुन्हा एकदा इच्छुक आहेत. दरम्यान, आपणाला प्रचाराच्या तयारीला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी ‘पुढारी न्यूज’शी बोलताना आज (दि.२५) दिली. Kolhapur Lok Sabha Election

संजय मंडलिकांनी केला संभ्रम दूर

मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यावरून भाजप अंतर्गत विरोध होता. चंदगडचे भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी मंडलिक यांना विरोध दर्शविला होता. तर भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये मंडलिक यांच्याविषयी नकारात्मक बाबी नोंदविल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्याच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, मंडलिक यांनी हा संभ्रम दूर केला आहे. आपणाला कामाला लागण्याच्या सुचना स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मतदारसंघात महायुतीतील सर्वच घटक पक्ष माझ्या विजयासाठी काम करतील. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही महायुतीचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. Kolhapur Lok Sabha Election

महायुतीकडून शिवसेनेतील माझ्यासह विद्यमान 13 खासदारांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांच्या बाबतीत व्यक्त केली जाणारी साशंकता दूर केली आहे. भाजप-शिवसेनेतील वरिष्ठांची दिल्लीत लवकरच बैठक होणार आहे. त्यात शिक्कामोर्तब होऊन दोन दिवसांत उमेदवारी जाहीर होईल, अशी माहिती खासदार संजय मंडलिक यांनी रविवारी दिली होती.

गेले काही दिवस मुंबईत तळ ठोकून असलेले खा. मंडलिक शनिवारी कोल्हापुरात परतले. चार दिवस मुंबईत असल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला नव्हता; परंतु आता कोल्हापुरात आल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रचार यंत्रणा जोमाने राबविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. मतदारांशी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीची उमेदवारी शाहू महाराज यांना मिळाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निवडणूक होणार आहे. माझे व्यक्तिगत शत्रुत्व कुणाबरोबर नाही; परंतु प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहेत, यापेक्षा आपल्या विचारांच्या लोकांना एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे, असेही खा. मंडलिक यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button