शाहू महाराज यांना उमेदवारी, हे शरद पवारांचे षड्यंत्र; खा. संजय मंडलिक यांचा घणाघात

शाहू महाराज यांना उमेदवारी, हे शरद पवारांचे षड्यंत्र; खा. संजय मंडलिक यांचा घणाघात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शाहू महाराज यांची निवडणुकीस उभे राहण्याची इच्छा होती की नाही, हे मला माहिती नाही; मात्र शाहू महाराज यांना निवडणुकीला उभे करण्याचे षड्यंत्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे असल्याचा घणाघात खा. संजय मंडलिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. मी त्यांना मानतो; परंतु शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा कधी व्यक्त केली नव्हती; पण आता ते उभे राहत आहेत. यामागे शरद पवार यांचेच षड्यंत्र आहे. कदाचित त्यांना मंडलिक कुटुंबावरील जुना राग काढायचा असावा, असे खा. मंडलिक म्हणाले. समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता मंडलिक म्हणाले, त्यांनी कधी लोकसभा निवडणूक लढवणार, असे विधान केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यात रस दिसतो.

रविवारी दुपारपर्यंत महायुतीच्या उमेदवारांच्या घोषणेची शक्यता आहे. उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार आहे. निवडणुकीची तयारी म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मेळावा घेतला. माझ्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागतील. माझी उमेदवारी घोषित नसल्याने मी शुक्रवारच्या मेळाव्याला उपस्थित नव्हतो. उमेदवारी घोषित झाल्यानंतर महायुतीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारीबाबत वावड्या… सरावाच्या कुस्त्या

महायुतीतील प्रत्येक पक्षाला माझ्या विचाराचा माणूस या शाहूंच्या भूमीतून निवडून यावा, असे वाटते. उमेदवारीवरून वावड्या उठल्या तरी मी गैर समजत नाही. निवडणुकीच्या काळात असे प्रकार होत असतात, असे सांगून खा. मंडलिक म्हणाले, खासबाग मैदानात एखाद्या पैलवानाची कुस्ती असेल, तर त्याला सराव देण्यासाठी तालमीतील सर्व पैलवान आखाड्यात उतरत असतात. त्याच पद्धतीने या वावड्या म्हणजे सरावाच्या कुस्त्या आहेत. आ. प्रकाश आबिटकर ठाकरे गटाकडे परतणार या अ‍ॅड. असिम सरोदे यांच्या दाव्याकडे लक्ष वेधल्यावर मंडलिक म्हणाले, सरोदे हे ज्योतिषी आहेत का? आ. आबिटकर हे विकासासाठी झटणारे आहेत. ते निश्चितच आमच्याबरोबर असतील. दुसरीकडे जाण्याचा विचार ते करणार नाहीत.

सतेज पाटील माझ्या स्टेजवर दिसतील

मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत भाष्य करताना अद्याप उमेदवारीबाबत निश्चित काही घडलेले नाही. राजकारणाचे फासे पलटतील आणि काही लोक आमच्यासोबत प्रचारात दिसतील या आ. सतेज पाटील यांच्या विधानावर बोलताना मंडलिक म्हणाले, सतेज पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. तेच माझ्या स्टेजवर दिसतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news