उमेदवारीसाठी नजरा मुंबईकडे | पुढारी

उमेदवारीसाठी नजरा मुंबईकडे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणाच झाली नसल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. शाहू महाराज व राजू शेट्टी वगळता अन्य कोणाचाही प्रचार सुरू नाही. हातकणंगलेतून काय करायचे, याचा अद्याप निर्णय नसल्याने ठाकरे शिवसेनेने सत्यजित पाटील- सरूडकर व डॉ. सुजित मिणचेकर यांना तयार राहण्यास सांगितले आहे; तर ठाकरे गटाच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करण्याचे आवाहन करण्यात आले.

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाला सहकार्य करणारे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. अद्याप त्यांच्या उमेदवारीबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. या दोघांनीही आपली उमेदवारी नक्की असल्याचे सांगितले असले, तरी त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवात नाही. मात्र, त्यांनी थेट संपर्क सुरू केला आहे.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार, असे जाहीर होताच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. सर्वांनाच उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने त्यांची निराशा झाली. आता शिंदे गटाचे उमेदवार बुधवारी जाहीर होतील, असे सांगितले जात आहे. भाजपच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे महायुतीच्या उर्वरित उमेदवारांच्या नावांची घोषणा एक-दोन दिवसांत होणार, हे स्पष्ट झाले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी दोन्ही विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत यामध्ये फारसा बदल होईल, असे वाटत नसल्याचे सूचक वक्तव्य केले आहे; तर संभाजीराजे यांनी राधानगरी परिसरात संपर्क दौरा केला आहे.

मालोजीराजे यांनी पॅलेस कार्यालयात सोमवारी दिवसभर थांबून पुढील प्रचारमोहिमेचे नियोजन केले. त्यानुसार शाहू महाराज हे उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघातील प्रमुख गावांचा संपर्क दौरा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सुपर वॉरियर्सची बैठक मंगळवारी (दि. 19) दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे हे कोल्हापूर, हातकणंगलेसह पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

कोल्हापूरला काँग्रेस, सांगलीत सेनेचा उमेदवार : संजय राऊत

मुंबई : कोल्हापूर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, कोल्हापूरमधून शाहू महाराज हे निवडणूक लढवत असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला आहे. त्याबदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा घेतली आहे, असे शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून, दोन दिवसांत त्याची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात शनिवारी नेहरू सेंटरमध्ये बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व ठाकरे गटात सुरू असलेल्या वादासंदर्भात राऊत म्हणाले, रामटेकची जागा आणि कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत.

राहुल गांधी भावी पंतप्रधान

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात विचारले असता, राऊत म्हणाले, राहुल गांधी देशातले लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधींकडे देश भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना पसंती आहे. लोकांची ती भूमिका आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडतात. ते झुकत नाहीत, हुकूमशाहीपुढे नमत नाहीत. त्यांचा हा बाणा देशातल्या लोकांना आवडतो.

Back to top button