Agriculture : कृषी अवजारेनिर्मितीत कोल्हापूरची भरारी | पुढारी

Agriculture : कृषी अवजारेनिर्मितीत कोल्हापूरची भरारी

कोल्हापूर : डी. बी. चव्हाण, 
देशात पंजाब, हरियाणामध्ये कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यानंतर आता महाराष्ट्रात कृषी यांत्रिकीकरणाला वेग आला आहे. सुमारे 25 ते 30 टक्के क्षेत्रात जमिनीच्या मशागतीपासून काढणी व विक्रीपर्यंतचे काम यंत्राद्वारे केले जात आहे. कोल्हापूर व सांगली या सधन व पाण्यामुळे संपन्न जिल्ह्यामध्ये 18 ते 20 टक्के क्षेत्रावर स्वयंचलित व ट्रॅक्टरचा आधाराने यंत्रांचा वापर केला जात आहे. (Agriculture)

कृषी क्षेत्रात वापर होणारी ही यंत्रे तयार करण्यासाठी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक आघाडीवर असून या विभागातील नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून दरवर्षी 70 ते 80 नवीन यंत्रांची निर्मिती केली जात आहे. त्याची वार्षिक उलाढाल कोट्यवधीमध्ये होत आहे. विभागात कृषी यांत्रिकीमध्ये 40 वर उद्योजक कार्यरत आहेत, असे सांगितले जाते.
हवामान बदलातून निसर्गाचा लहरीपणा दरवर्षी अनुभवायास येत आहे. त्याचा कमी-जास्त प्रमाणात फटका शेतीला बसतो. दुसर्‍या बाजूला शेतीत काम करण्यासाठी मजुरांची उपलब्धता कमी होत आहे. उन्हातान्हात व पावसाळ्यात शेती काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत शेती करण्यासाठी योग्य वेळ साधणे आणि त्या वेळेची बचत करण्यासाठी व शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी कृषी यंत्राची गरज वाढत आहे.

कृषी क्षेत्रात ऊर्जेची उपलब्धता वाढविण्यासाठी शेतीमध्ये ट्रॅक्टर, स्वयंचलित कृषी औजारे, पॉवर टिलर, इलेक्ट्रिकल मोटार, डिझेल इंजिन यांचा वापर केला जात आहे. गेल्या काही पंचवार्षिक योजनांपासून शासकीय स्तर, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे सध्या मशागतीमध्ये 45 टक्के, पेरणीमध्ये 35 टक्के, मळणीसाठी 55 टक्के, तर पीक संरक्षणात 35 टक्के इतके यांत्रिकीकरण झाले आहे.

यंत्राद्वारे शेती करण्यासाठी जमिनीचे क्षेत्र जास्त असावे लागते; पण सध्या विभक्त कुटुंबपद्धत वाढत आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये हिस्से पडत आहेत. अशा जमिनीत यंत्राद्वारे शेती करणे न परवडणे ठरत आहे. यासाठी छोट्या व लहान शेतकर्‍याला परवडेल अशी यंत्रे निर्माण झाली पाहिजेत, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

Agriculture : कोल्हापूरची आघाडी

कृषी अवजारनिर्मिती करण्यात हरियाणा, पंजाब ही राज्य आघाडीवर होती. तिकडून कृषी यंत्रे पुरवली जात होती. अलीकडच्या काळात यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उद्योजक तयार झाले आहेत. त्यांच्याकडून शेतीच्या मशागतीपासून सर्व प्रकारची शेतीविषयक कामे करणारी यंत्रे निर्माण केली जात आहेत. यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

शेतातील कामे वेळेवर, कमी कष्टात व बियाणे, खते, रसायने, यांचा योग्य व कार्यक्षम वापरासाठी अवजारे व यंत्राचा वापर म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण होय. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्चात 30 ते 40 टक्के बचत होते, तर वेळच्या वेळी कामे झाल्याने उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
– डॉ. तुळशीदास बास्तेवाड,
कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख

 

Back to top button