मंगरायचीवाडी फाट्याजवळ दुचाकी अपघातात नर्सिंगचा विद्यार्थी जागीच ठार तर दोन गंभीर | पुढारी

मंगरायचीवाडी फाट्याजवळ दुचाकी अपघातात नर्सिंगचा विद्यार्थी जागीच ठार तर दोन गंभीर

किणी; पुढारी वृत्तसेवा : सिमेंटच्या दुभाजकाला बुलेट धडकल्याने झालेल्या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. आविष्कार गोरख दाभाडे (वय २२ रा.काखे, ता.पन्हाळा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावर मंगरायाचीवाडी फाट्याजवळच्या पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. याबाबत माहिती अशी की, कोडोली येथे नर्सिंगचे शिक्षण घेणारा अविष्कार दाभाडे हा रविराज पाटील याचेसह त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आपला मित्र प्रताप गुलाब पाडवी (वय २० मूळ रा. जुगलखेत ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार) हा रात्री नंदुरबारहुन कोल्हापूर येथे आला असल्याने त्याला आणण्यासाठी गेले होते. त्याला घेऊन बुलेट मोटरसायकल (क्रमांक-एमएच-०९-जीएच- ४५८१) वरून कोल्हापूरकडून वाठारच्या दिशेने येत असताना मंगरायाचीवाडी फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या वळणासाठी म्हणून लावलेल्या सिमेंटच्या ब्लॉकला जोरात त्यांची बुलेट धडकली. या धडकेत आविष्कार याच्या डोक्याला, हाताला व पायाला लागल्याने तो गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र प्रताप पाडवी व रविराज कुबेर पाटील (वय २२,रा.काखे) यांना गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आविष्कारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती.आविष्कार हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता.त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

Back to top button