Sharad Pawar : प्रतिगामी शक्तींविरोधात लढा हीच पानसरे स्मारकाची प्रेरणा : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : प्रतिगामी शक्तींविरोधात लढा हीच पानसरे स्मारकाची प्रेरणा : शरद पवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सत्तेचा गैरवापर केला जात असल्याने प्रतिगाम्यांची ताकद वाढली आहे. या ताकदीच्या आधारे दीन-दलित आणि दुबळ्यांवर अन्याय केला जात आहे. केवळ निवडणुकीपुरते या प्रतिगामी शक्तींशी लढून उपयोग होणार नाही. तर त्यासाठी कायमस्वरूपी लढाईची सुरुवात पुरोगामी कोल्हापुरातून करा. हीच खरी कॉ. गोविंद पानसरे यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी मंगळवारी येथे केले. (Sharad Pawar)

महापालिकेने प्रतिभानगर येथे उभारलेल्या कॉ. गोविंद पानसरे स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. खासदार डी. राजा, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. (Sharad Pawar)

कॉ. गोविंद पानसरे यांनी आपले जीवन सामान्य माणसाचे भले करण्यासाठी समर्पित केल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, पुरोगामी चळवळीला बळ देणारे कोल्हापूर आणि अहमदनगर हे दोन जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पानसरे यांचा जन्म नगर येथे झाला, तर त्यांची कर्मभूमी कोल्हापूर राहिली. समतावादी, मानवतावादी विचार वाढविण्यासाठी पानसरे यांनी नेहमीच प्रयत्न केले. अनेक पुस्तके, ग्रंथ लिहिले. अलीकडे प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. विचारांची लढाई विचारांऐवजी ते कायदा हातात घेऊनच करत आहेत. त्यातूनच नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यांचे सत्रच महाराष्ट्रात झाले. समाजाला भलतीकडेच घेऊन जाणारी ही प्रतिगामी शक्ती आता नष्ट करण्याची गरज आहे.

राज्यघटना वाचवा, देश वाचवा

राज्यघटना मोडीत काढण्याचा प्रकार सध्या देशात सत्ताधारी पक्षांकडून सुरू असल्याचे सांगून खासदार डी. राजा म्हणाले, या देशाला एकसंघ ठेवायचे काम करणार्‍या राज्य घटनेच्या मूळ ढाच्याला तडा देत धर्माधिष्ठित राजकारण केले जात आहे. राज्यघटना वाचवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.

भावनेच्या राजकारणाला बळी पडू नका

देशात भावनिक राजकारण केले जात आहे. त्याला बळी पडू नका, असे सांगून काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र ही पुरोगामी विचार देणार्‍या संताची भूमी आहे. परंतु, लोकांची धर्माच्या नावाने दिशाभूल करून भावनिक राजकारण केले जात आहे.

कोल्हापुरातून देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल

पानसरे यांनी समतेच्या विचारांसाठी आपले आयुष्य पणाला लावले असल्याचे सांगून शाहू महाराज म्हणाले, प्रगतशील आणि पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख कायम ठेवण्यासाठी येत्या निवडणुकीत देशाच्याच राजकारणाची दिशा बदलण्याचे काम कोल्हापुरातून केले जाईल. यावेळी भालचंद्र कांगो, स्मिता पानसरे यांची भाषणे झाली. सतीशचंद्र कांबळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास उमा पानसरे, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, व्ही.बी.पाटील, जयसिंगराव पवार, विजय देवणे, आर.के.पोवार, राजू लाटकर, वसंतराव मुळीक, शारंगधर देशमुख, शमशुद्दीन मुश्रीफ, रघुनाथ कांबळे, उदय नारकर आदी उपस्थित होते. दिलीप पवार यांनी आभार मानले. (Sharad Pawar)

पानसरेंचे स्मारक विचारांची ज्योत तेवत ठेवेल

कॉ. गोविंद पानसरे यांनी सत्तेत कोण आहे हे कधी पाहिलेच नाही, असे सांगून आमदार सतेज पाटील म्हणाले, पानसरे यांनी शोषित, वंचितांसाठी लढा दिला. स्मारकामुळे त्यांच्या समतावादी विचारांची ज्योत कायम तेवत राहील. प्रतिगामी शक्तींकडून सुरू असलेले वैचारिक प्रदूषण रोखण्यात हे स्मारक महत्त्वाची भूमिका बजावेल.

Back to top button