विशेष अधिवेशनात आरक्षण देणार : मुख्यमंत्री शिंदे  | पुढारी

विशेष अधिवेशनात आरक्षण देणार : मुख्यमंत्री शिंदे 

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल.  सर्वोच्च न्यायालयात जे आरक्षण रद्द झाले, त्यातील सर्व त्रुटी लक्षात घेऊन मागास वर्ग आयोगाने सर्वेक्षणाचे काम केले आहे. यामुळे मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिकद़ृष्ट्या मागासलेपण या अहवालातून सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
या अहवालावर चर्चा करण्यासाठीच मंगळवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले असल्याचे  आणि त्यावेळी मराठा आरक्षणाचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची कालही भूमिका होती, आजही आहे आणि कायम राहील, असे सांगत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. यामुळे जरांगे यांनीही सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
शिवसेनेच्या महाअधिवेशनासाठी मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांसाठी कोल्हापुरात आले आहेत. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार पूर्ण सकारात्मक आहे. पहिल्या दिवसापासून सरकाची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देत असताना, ओबीसी समाजावर तसेच अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काल होती, आज आहे, कायम आहे.
अधिवेशनात चर्चा
मागास वर्ग आयोगाने अहवाल सादर केला आहे. तो मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल. त्यावर चर्चा होईल आणि मंगळवारी (दि. 20) याकरिताच विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनातही त्यावर चर्चा होईल, असे सांगत शिंदे म्हणाले, मागासवर्गीय आयोगाने अतिशय विश्वासाने मायक्रो लेव्हलला जाऊन काम केले आहे. दररोज चार लाख लोक दिवस-रात्र काम करत होते. अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाचे काम झाले आहे. मराठा समाजाचे आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले, त्यातील त्रुटी लक्षात घेऊन मागास वर्ग आयोगाने काम केले आहे. मराठा समाज समाजिक आणि शैक्षणिकद़ृष्ट्या कसा मागास आहे, ही वस्तुस्थिती या अहवालात असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतील : खा. शिंदे
मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर आहेत. मराठा आरक्षणाबाबत मागास वर्ग आयोगाचा अहवाल आला आहे. त्यावर 20 तारखेला चर्चा होईल. त्यामुळे मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होतील, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्या. शिंदे समिती काम करत आहे. यापूर्वी इतिहासात कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले दिले गेले नाहीत, असेही शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरेसुद्धा अशाच पद्धतीने अधिवेशन घ्यायचे. त्यांच्या विचारानुसार आम्हीसुद्धा पुढे पावले टाकत आहोत. असे अधिवेशन अनेक वर्षे झाले नाही. आता होत आहे. सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असेही खा. शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेसाठी महाअधिवेशन लकी ठरेल
बाळासाहेबांची भूमिका घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरातून करण्याचे ठरवले. या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा होणार असून शिवसेनेसाठी हे महाअधिवेशन लकी ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
आम्हा सगळ्यांसाठी स्वतःची काळजी घ्या
आपल्या ज्या मागण्या आहेत, त्या आजपर्यंत पूर्ण केल्या आहेत. आपल्या संघर्षाला सकारात्मक प्रतिसाद आम्ही दिला आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. आम्हा सगळ्यांसाठी स्वतःची काळजी घ्या, असे आवाहनही खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनोज जरांगे यांना  केले.
मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतील : खा. शिंदे
मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर आहेत. मराठा आरक्षणाबाबत मागास वर्ग आयोगाचा अहवाल आला आहे. त्यावर 20 तारखेला चर्चा होईल. त्यामुळे मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होतील, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्या. शिंदे समिती काम करत आहे. यापूर्वी इतिहासात कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले दिले गेले नाहीत, असेही शिंदे यांनी सांगितले.

Back to top button