कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा सादरीकरण | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा सादरीकरण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीरनिवासिनी अंबाबाई परिसराच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे सादरीकरण मंगळवारी नागरिकांसाठी करण्यात आले. अंदाजे साडेतीन एकर जागेवर व्यापारी संकुल, पार्किंग, भूमिगत दर्शन रांग, अन्नछत्र, चप्पल स्टँड अशा सुविधांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा जोपासत आधुनिक बांधकामाची जोड देण्याचा परिपूर्ण विचार करण्यात आल्याचे ख्यातनाम आर्किटेक्ट सुनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स यांच्या पुढाकारातून अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. रेसिडेन्सी क्लब येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आराखडा बनविणारे आर्किटेक्ट सुनिल पाटील यांनी यावेळी उपस्थितांसमोर मंदिर आणि परिसरात करण्यात येणार्‍या कामांचे थ्रीडी सादरीकरण केले.

पाच हजार भाविकांचा दर्शन मंडप

विद्यापीठ हायस्कूलच्या बाजूला भाविकांसाठी दर्शन मंडप उभारण्यात येणार असून, यामध्ये 1 हजार लोकांची बैठक व्यवस्था, तर पाच हजार भाविक सावलीमध्ये रांगेत थांबू शकतील, अशी व्यवस्था समाविष्ट आहे.

शेतकरी संघामध्ये विश्रांती गृह

शेतकरी संघाच्या इमारतीजवळ विश्रांतीगृहाची उभारणी केली जाणार आहे. तर या परिसरातील प्लाझामध्ये मंदिराशी संबधित व्यापार्‍यांचे दुकानगाळे, वरील मजल्यावर वेदशाळा, अन्नछत्राची उभारणी करण्यात येईल.

पागा बिल्डींग, काशी विश्वेश्वर, जुना राजवाडा परिसरातील मंदिरे, हेरिटेज वास्तूंचे जतन करून त्याच्या सभोवती अत्याधुनिक बांधकामाचे नमुने अगदी या परिसराचे सौंदर्य द्विगुणीत करत उभ्या राहतील, असा विश्वास यावेळी सुनिल पाटील यांनी बोलून दाखवला.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, उपाध्यक्ष विजय चोपदार, सार्वजनिक बांधकामचे अभियंता एस. पी. कुंभार, सचिव राज डोंगळे, ॠषिकेश कुलकर्णी, क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्यासह आर्किटेक्ट, इंजिनिअर व नागरिक उपस्थित होते.

बिनखांबी गणेश मंदिराकडून भुयारी मार्ग

मंदिराच्या दक्षिण दरवाजा ते बिनखांबी गणेश मंदिर परिसरात 12 फूट खोलीचा भाविकांच्या येण्या-जाण्यासाठी प्रशस्त मार्ग बनविण्यात येणार आहे. बिनखांबी गणेश मंदिरापासून या भुयारी मार्गाने भाविक मंदिराकडे पोहोचू शकतील.

Back to top button