अंगणवाडी सेविका, मदतनीस आक्रमक | पुढारी

अंगणवाडी सेविका, मदतनीस आक्रमक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यभर सुरू असलेल्या अंगणवाडी महिला कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भरदुपारी महामार्ग रोखण्यासाठी निघालेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांना पोलिसांनी अडविल्यामुळे त्यांनी सुमारे दोन तास तावडे हॉटेल चौकातच ठिय्या मांडला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे नेत्यांनी जाहीर केल्यानंतरदेखील महिला आंदोलक जागेवरून उठल्या नाहीत. उलट त्यांनी कोल्हापूरहून पंचगंगा पुलाकडे जाणारा रस्ताही रोखून धरला. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांच्यासह शंभर महिलांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांत किरकोळ वादावादी झाली.

मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी दि. 4 डिसेंबरपासून अंगणवाडी महिला कर्मच्यार्‍यांनी संप पुकारला आहे. संपाच्या 51 व्या दिवशी मंगळवारी तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला होता. रास्ता रोको सुरू करण्यापूर्वी अतुल दिघे व सुवर्णा तळेकर यांची भाषणे झाली. त्यांनी आंदोलनाचे स्वरूप सांगितले. त्यानंतर महामार्गाकडे जाऊ लागलेल्या महिलांना पोलिसांनी रोखले. बळाचा वापर केला. त्यामुळे महिला आंदोलकांनी तावडे हॉटेल चौकात पुलासमोरच ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांनी संघटेनेचे अध्यक्ष दिघे यांच्यासह सुमारे 100 महिलांना ताब्यात घेतले. दिघेंना ताब्यात घेतल्यानंतर महिला अधिकच आक्रमक झाल्या आणि एका गटाने कोल्हापूरहून पंचगंगा पुलाकडे जाणारा रस्ता अडवला.

गांधीनगर व पंचगंगा नदीकडे जाणारे मार्ग रोखल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिस निरीक्षक अजयकुमार शिंदकर यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु, महिला ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. त्यांनी पुन्हा घोषणा देण्यास सुरुवात केली. महिला आक्रमक होत असल्याचे पाहून संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर यांनी आपला संप असाच सुरू राहील, असे सांगून आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले; तरीही महिला रस्त्यावर ठाण मांडून बसल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी पोलिस व त्यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली. काही महिला रस्त्यावरच आडव्या झाल्या. महिला आक्रमक होत होत्या. त्यामुळे संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांना आंदोलनस्थळी आणण्यात आले. त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याने आपण शांतपणे घरी जा, असे सांगितल्यानंतर सर्व महिला रस्त्यावरून बाजूला हटल्या.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या निवासस्थानांसमोर आजपासून ठिय्या

आंदोलनाचा पुढील टप्पा बुधवार, दि.24 पासून सुरू करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदारांच्या निवासस्थानांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी जाहीर केले.

Back to top button