मुलं घरातच… धान्य, किराणा अंगणवाडीत? | पुढारी

मुलं घरातच... धान्य, किराणा अंगणवाडीत?

विकास कांबळे

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप असल्यामुळे पोषण आहाराचे वितरण ठप्प आहे. अंगणवाडी उघडण्याचा प्रयत्न काही महिलांनी केला; परंतु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला. त्यामुळे मुलांना देण्यात येणारा पोषण आहार धान्य व किरणा स्वरूपात अंगणवाडीत पोहोच करण्यात येऊ लागला आहे. महिला बचत गट, महिला मंडळ, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या धान्याचे वितरण करण्याच्या सूचना एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. तसे पत्रही पाठविले आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि. 4 डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यांच्या मागण्यांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासंदर्भात मुंबईत आणि नुकतीच कोल्हापुरातही बैठक झाली. परंतु, मार्ग न निघाल्याने शुक्रवारी 47 व्या दिवशीदेखील त्यांचा संप सुरूच राहिल्यामुळे अंगणवाड्यांना अजूनही कुलूप आहे. त्यामुळे मुलांच्या पोषण आहाराचे वितरणदेखील बंद आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना ज्या ठिकाणी महिला मंडळ, बचत गट यांनी काम सोडले आहे, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई यांच्यामार्फत कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो. त्यानंतर अंगणवाडीमध्ये तो आहार शिजवून मुलांना खाऊ घालण्यात येतो. सध्या अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू असल्याने अंगणवाड्या बंद आहेत व त्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित आहेत. डिसेंबर महिन्यातील कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा कन्झ्युमर्स फेडरेशनमार्फत अंगणवाड्यांना करण्यात आला आहे. त्याचे वितरण करावे, असे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Back to top button