कोल्हापूर : गाय, म्हैस, पाळीव मांजर, कुत्र्यांवर आता अल्पदरात वैद्यकीय उपचार | पुढारी

कोल्हापूर : गाय, म्हैस, पाळीव मांजर, कुत्र्यांवर आता अल्पदरात वैद्यकीय उपचार

प्रवीण मस्के

कोल्हापूर : मानवास ज्याप्रमाणे लोकसेवा हक्क आहेत, त्याप्रमाणेच आता गाय, म्हैस, घोडा, पाळीव मांजर, कुत्रा यांच्यावरील छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया, तपासणी, चाचण्यांना लोकसेवा हक्क प्रदान करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात पशुसंवर्धन विभागाच्या 82 सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या स्थापनेचा मूळ हेतू पशूंचे स्वास्थ्य व रोगनियंत्रण, पशू प्रजनन, पशू व कुक्कुट पक्ष्यांचे उत्पादन वाढवून शेतकर्‍यांचा विकास साधणे आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालक, शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या विविध पशुवैद्यकीय सेवा लोकाभिमुख करण्यात आल्या आहेत. कृषी, पशुसंवर्धन विभागाने 82 सेवांचा लोकसेवा हक्क अधिनियमात समावेश करण्यास मान्यता दिली आहे. सेवा पुरविण्याची कालमर्यादा व शुल्क निश्चित केले आहे.

पाळीव कुत्रा, मांजर, पशुरुग्ण, जनावरांवरील प्रथमोपचारासाठी 10 रुपये, लहान शस्त्रक्रियेसाठी एका दिवसाची मर्यादा आणि शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कुत्रा, मांजरांवरील मोठ्या शस्त्रक्रियांसाठी 150 रुपये आकारले जातील. त्याशिवाय गाय, म्हशीतील गर्भधारणा तपासणी 10 रुपये असेल. पशुरुग्णावर औषधोपचारासठी प्रतिरुग्ण 10 रुपये असतील. मोठ्या जनावरांच्या आरोग्य दाखल्यासाठी 20 रुपये शुल्क असेल. घोड्याच्या सांसर्गिक गर्भदाह तपासणीसाठी आठ दिवस कालावधी, तर 2000 रुपये शुल्क निश्चित केले आहे.

Back to top button