Amal Mahadik : राजाराम कारखान्याची नाहक बदनामी थांबवा : अमल महाडिक | पुढारी

Amal Mahadik : राजाराम कारखान्याची नाहक बदनामी थांबवा : अमल महाडिक

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना अमानुष मारहाण झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी सतेज पाटील समर्थक अनेक अफवांना ऊत आणत आहेत, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे केला आहे. (Amal Mahadik)

नेजदार यांच्या उसाला तोड मिळाली हे वृत्त धादांत खोटे असून, संदीप नेजदार यांचा 178 टन ऊस 16 नोव्हेंबर ते 26 डिसेंबरदरम्यान कारखाना प्रशासनाने तोडला आहे. नेजदार यांनी जितक्या क्षेत्राची नोंद कारखान्याकडे केली होती तो ऊस कारखान्याने तोडला आहे. त्यापैकी 30 नोव्हेंबरअखेर तुटलेल्या 172 टन उसाचे 5 लाख 35 हजार 820 रुपयांचे बिलही नेजदार यांच्या कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीच्या खात्यावर नियमानुसार जमा करण्यात आले आहे. (Amal Mahadik)

शिये पुलाजवळच्या उसाची नोंद बिगर सभासद तुषार नेजदार यांच्या नावे कारखान्याकडे करण्यात आलेली आहे. कार्यकारी संचालकांना मारहाण होण्यापूर्वीच दि. 6 डिसेंबरपासून तुषार नेजदार यांच्या उसाची तोड वेळापत्रकानुसार सुरू आहे. आजतागायत ही तोड विनाव्यत्यय सुरू आहे. तुषार नेजदार हे बिगर सभासद असूनही कारखाना प्रशासनाने कोणताही दुजाभाव केलेला नाही. असे असताना निव्वळ राजकीय विरोध म्हणून सतेज पाटील यांच्या समर्थकांकडून छत्रपती राजाराम कारखान्याची बदनामी सुरू आहे, असेही पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Back to top button