अजून दोन विधानसभा लढवणार : हसन मुश्रीफ | पुढारी

अजून दोन विधानसभा लढवणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आपण आणखी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तालुक्यातील जनतेची सेवा करायची आहे, असे शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणप्रश्नी शासन आपले प्रयत्न सोडणार नाही व मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगत दोघांनीही हे प्रकरण जास्त न ताणता, समाजाचे भले कसे होईल, हे पहावे असे आवाहनही त्यांनी केले.

भाजप एकटाच लढणार असे म्हणत, तीन पक्षांमध्ये भांडण लावण्याचा उद्योग जितेंद्र आव्हाड करत आहेत, असे सांगत तीनही पक्षाचे प्रमुख जागा वाटपाबाबत निर्णय घेतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले. मी दिल्लीला खासदार झालेलो नाही. यामुळे संसदेत नक्की काय वर्तन झालेला आहे हे मला माहीत नाही, असे खासदार निलंबन प्रकरणी त्यानी सांगितले.

मुश्रीफ म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुजबळांची भूमिका आहे. मंत्रिमंडळात आणि ओबीसीच्या सभेत तीच मागणी ते करतात. जरांगेंच्या मागणी संदर्भात शासनाचे शिष्टमंडळ दुसर्‍यांदा त्यांच्याकडे गेले. सरसकट आरक्षणाच्या शासकीय अडचणी बाबत चर्चा झाली.

कोणाला आरक्षण मिळेल या संदर्भात त्यांनी माहिती दिली, त्या संदर्भात लवकरच तोडगा निघेल. सरकारने सरसकट दाखला मिळणार, असे म्हटले नाही. यामुळे शासनाने फसवण्याचा प्रश्न येत नाही. गुरुवारची चर्चा विस्कटली असेल तर आम्ही पुन्हा चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

पापाची तिकटी येथील संभाजीराजे यांचे स्मारक अपूर्ण होते की पूर्ण होते हे माहीत नाही मात्र, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे माझे दैवत आहेत, म्हणून मी ते आमंत्रण स्वीकारले. आम्हाला जी शिक्षा होईल ती मान्य असेल, असेही ते म्हणाले.

Back to top button