दुसरा हप्ता साखरेचा दर पाहून मागणार; जयसिंगपूरात २२ व्या ऊस परिषदेत स्वाभिमानीचा एल्गार | पुढारी

दुसरा हप्ता साखरेचा दर पाहून मागणार; जयसिंगपूरात २२ व्या ऊस परिषदेत स्वाभिमानीचा एल्गार

जयसिंगपूर; संतोष बामणे : आमची लढाई घामांच्या दामासाठी आहे. जर आम्हाला मागील 400 रूपये दिवाळीला पैसे दिले नाहीतर साखर कारखानदांराची दिवाळी निट होवू देणार नाही. मी आता दिवाळीला घरी जाणार नाही तर याच स्टेजवर 15 तारखेपर्यत आंदोलनाला बसतोय. अजुनही वेळ गेली नाही. तातडीने पैसे द्यावेत अन्यथा साखर कारखाने चालू देणार नसून ऊसाला तोडीही घेणार नाही. आमची दिवाळी गोड होणार नसेल तर दिवाळीमध्ये पाच दिवस कारखानदारांच्या चेअमरनच्या घरात जावून भाकरी, खर्डा व कांदा देवून द्या या असे सांगत. चालू हंगामात पहिली उचल 3500 रुपये द्यावी आणि दुसरा हप्ता साखरेचे दर पाहुन मागणार असल्याची घोषणा स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

जयसिंगपूर (जि.कोल्हापूर) येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी विराट ऊस परिषद हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाली. यावेळी शेट्टी यांनी ऊस दरांची घोषणा केली. शेट्टी पुढे म्हणाले, मी कर्नाटकांतील कारखानदाराचा फायदा करुन देत असल्याचा आरोप कारखानदार करीत आहेत. तुम्ही पहिला 400 द्या तुम्हाला कर्नाटकांतील ऊस आणून देतो. कारखानदारांना पैसे बुडवायचे असल्याचे नाटक सुरु आहे. मग सहकारमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जादाचे पैसे दिले आहेत. मग मुश्रीफ साहेब आम्ही काय चुकीची मागणी केली आहे. तर सतेज पाटील म्हणतात मागचं काय मागू नका पुढच्या दरात वाढवून देतो. त्यामुळे आम्हाला भिक नको आमच्या हक्काचे पैसे द्या. साखर व उपपदार्थामध्ये ज्याचे पैसे आले व खर्च जाता 400 रुपये पेक्षा जादा पैसे शिल्लक राहीले राहीले आहेत.

माळेगांव कारखान्याने 460 रुपये जादाचे दिले आहेत. तुमच्या कारखान्याचे जादाचे पैसे कुठे गेले ते सांगा. सहकारमंत्री व उपमुख्यमंत्री एफआरपीपेक्षा 562 रुपये जादा दिले आहेत. मग मुश्रीफ साहेब त्याचे चुकले आहे का? हे तुमचे नेते आहेत. मग तुम्हाला काय अडचण आहे. शिल्लक साखरचे मुल्यांकन करुन हिशोब पुर्ण करुन 14 कारखान्यांनी पैसे दिले आहेत. मग बाकीच्यानी पैसे हाणले आहेत. यात मुश्रीफ साहेब तुमचा वाटा आहे का? हे सर्व काशीला जावून गंगास्थान करुन आले का? असा सवाल शेट्टी यांनी केला.

शेतकर्‍यांना 2900, 2950, 3001, 3100 दर जाहीर करता. रिकव्हरी जादा असूनही आपण पैसे बुडविलेले आहेत. म्हणून 22 दिवसांची पायपीठ केली आहे. मुश्रीफ साहेब तुम्हाला जगावेगळे करायला लावत नाही. तर अजितदादानी जे केले त्याप्रमाणे, आमचे पैसे दया नाहीत तुम्हाला आडजेसमेंट करायले येते. नाहीतर भलत्या कारणासाठी पैस घेतले म्हणून कायकोर्टाने ताशिरे ओढले नसते. आम्ही साखर अडवायला सुरु केली आहे. रात्री काटा मारलेली व रिकव्हरी मारलेली साखर विकायला चाललेली आहे. बिलाशिवाय साखर वाहतुक होते कशी. पोलीस शेतकर्‍यांच्या वाहनाची कागदे तपासतात. मात्र साखर वाहतुकीची कागदे तपासत नाहीत. त्यांना 15 टनाच्या गाड्या बघायला वेळ नसल्याचे सांगत मागील 400 रुपये घेतल्याशिवाय कारखानदांराना सोडणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शहीद जवान, आत्महत्या केलेले शेतकरी, मराठा आरक्षण लढ्यासाठी शहीद मराठा बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते राजाराम वाकरेकर होते. स्वागत स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके तर प्रस्तावित प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले. ऊस परीषदेत शेट्टी मांडलेल्या 11 ठरावाला शेतकर्‍यांनी हात उंचावून मंजूरी दिली.

यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक म्हणाले, 400 रुपये मिळावेत म्हणून कारखानदांराना निवेदने, आंदोलन व पदयात्रा काढली आहे. तरीही पैसे देण्यासाठी कारखानदांराची मानसिकता नाही. साखरेचे दर 3800 रुपये असतानाही तुम्ही शेतकर्‍यांना बुडवायला निघाला आहात. कारखानदार तोट्यात आहेत तर मग कारखाने विस्तारायचे काम कसे सुरु आहे. तुम्ही किती दिवस ऊस पोलिस बंदोस्तात आणणार आहात हे आम्हाला पहायचे आहे. तर तुम्हाला एक दिवस शेतकर्‍यांच्या बांधावर यायच आहे. तुम्ही पैसे घेवून पदे आम्ही घेतली नाहीत. त्यामुळे पहिला मागच बोला अन्यथा महिना गेला तरी चालेत मात्र ऊस देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रकाश बालवाडकर, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, पोपट मोरे, सागर संभूशेटे, शंकर नाळे, रामचंद्र शिंदे, मिलिंद साखरपे, सागर मादनाईक, संगिता शेट्टी, शुभांगी शिंदे, सरीता भवरे यांच्यासह राज्यभरातून हजारो शेतकरी, महिला आघाडी, पदाधिकारी यांची उपस्थितीत होते.

आमची गडवागडवी करता काय?

कारखानदारांनी विकलेल्या दराची तुलना केली तर कारखानदारी 80, 100, 150, 360 रुपये बाजारभावापेक्षा कमी दराने साखर विकली आहे. कोल्हापूर व सांगली तुम्ही पाप केले नाही. असे वाटत असेल तर 31 मे पासून आजपर्यत किती व काय दरांने साखर विक्री केली ते जाहीर करुन 37 कारखान्यांची माहिती द्या. मग दुध का दुध व पाणी का पाणी होईल. यात बाजारभावापेक्षा कमी दराने साखर विकली व फरकाची रक्कम रोखीने घेतली आणि खिशात घातली. तसेच कारखानदारांचया नातेवाईकांचे साखरेच्या ट्रेडिंग कंपन्या आहेत. यात कमी दरात सहकारी कारखान्याची साखर विकायची आणि खाजगी कारखान्याची साखर जादा दराने घ्यायचे हे धोरण आहे. अशी गडवागडवी केली तर 400 रुपये दिल्या शिवाय एक कांडही ऊस नेवू देणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मुश्रीफ साहेब आम्हाला भोपळा देणार आहेत

महसुली वाटप सुत्राने पैसे दयायला तयार असल्याचे मुश्रीफ साहेब सांगता. आम्हाला एफआरपीवर पैसे द्यायला लागू नयेत अशी व्यवस्था केली आहे. एफआरपीवर पैसे द्यावे लागतील म्हणून चोरुन साखर विकतात. मग मुश्रीफ साहेब आम्हाला भोपळा देणार आहे हे माहित आहे. गाळप हंगाम संपल्यानंतर 500 टन पेक्षा जादा टन किती शेतकरी देतात त्यांची नावे जाहिर करा. मग आम्ही तलाठ्याकडे जावून त्या शेतकर्‍याचे क्षेत्र किती आहे हे पाहतो. तसेच काटा मारलेला ऊस मुरवायलाही माणसे प्रामाणिक ठेवत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

नाहीतर हे 1200 कोटी स्विच बँकेत जातील

वजन काटे ऑनलॉईन केले पाहिजेत. साखर आयुक्त, पोलिस महासंचालक व शेतकर्‍यांना प्रथम मेसेज गेल्यानंर कारखान्यात नोंद झाली पाहिजे. हिम्मत असेत तर याला परवानगी द्यावी. पेट्रोल पंपासारखी व्यवस्था करायला हवी. हे सरकार साखर कारखानदारांचया ताटाखालचे मांजर आहे. मुख्यमंत्र्याबरोबर 3 वेळा बैठका झाल्या. तर राज्याला अधिकार नसताना एफआरपीत तुकटे करता. त्याला मी हायकोर्टात आव्हान दिले आहे. असे असताना विरोधी पक्ष ही पुढे यायला तयार नाहीत. त्यामुळे आपल्याला हिमतीने पैसे वसुल करायला लागतील. आमचं बुडावयला सर्व एक होतात. मग मागायला आम्हाला एक व्हायला हवे. 1200 कोटी आले तर बाजारपेठ फुलणार आहे. नाहीतर हे पैसे 37 घरात जावून स्विच बँकेत जातील. शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था पाझर तलावप्रमाणे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

आण्णा को गुस्सा क्यो आता है?

आण्णा, यड्रावकर, गणपतराव एका माळेचे मणी व जिल्हयातील सर्वच तसेच आहेत. साखर विक्री कोटा किती, त्यांचे रेकॉर्ड दाखवा. रिकव्हीरी कशी चोरली जाते ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला 4 ते 5 माणसे कारखान्यात नेमायला परवाना द्यावी. त्यांना आम्ही वर्गणी काढून पगार देतो. 1 गेटवर, 1 गोडाऊनवर, 1 काट्यावर व 1 सर्वत्र फिरायला नेमतो. मग बघा रिकव्हरी कशी वाढते. आम्ही ऊसाचा दर घेतात त्यावेळेपासून यांची रिकव्हरी कमी होते. त्यांना पुरस्कार कसे मिळतात. त्यामुळे यांना गुस्सा येत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

सलंग दुसर्‍याही वर्षी तुपकरांची गैरहजेरी!

गतवर्षीच्या 21 व्या ऊस परीषदेत रविकांत तुपकर यांची तब्बेत बरी नसल्याचे कारण सांगून तुपकर गैरहजर राहीले होते. तर 22 व्या ऊस परीषदेतही तुपकर गैरहजेरी असल्याने दुसर्‍यावर्षी अनुपस्थिती चर्चेचा विषय होता. तर त्यांची नाराजी असून दुर झालेली नाही अशी चर्चा होती.

कोल्हापूर लोकसभेसह विधानसभेच्या 10 जागा लढविणार

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून प्रा.जालंदर पाटील निवडुक लढविणार आहे. त्याचबरोबर जिल्हयातील 10 विधानसभेच्या जागा स्वाभिमानीकडून लढविण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यसाठी लोकसभा व विधानसभेत शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते गेले पाहिजेत यासाठी या जागा लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रा.जालंदर पाटील यांनी सांगितले.

ऊस परिषदेतील ठराव

1) दोन टप्यात एफआरपी देण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा. 2) शेतीपंपाचे होणारे भारनियमन करून विनाकपात दिवसा 12 तास वीज देण्यात यावी. वीज हॉर्स पॉवरची सक्ती न करता मीटर रिटींग प्रमाणे घ्यावे. 3) महाराष्ट्रात दुष्काळ असल्यानेे केवळ 40 तालुक्याला दुष्काळ जाहीर केला आहे. त्याचे निकष बदलून सर्कलनिहाय दुष्काळग्रस्त भाग घोषित करा. 4) गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रूपये द्यावेत. 5) राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे काटे तातडीने ऑनलाईन करावेत. 6) ऊस तोडणी मुकादमांनी ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातलेला आहे. त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून ऊस वाहतूकदारांचे पैसे वसूल करून द्यावेत. 7) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला स्वाभिमानीचा पूर्ण पाठिंबा. केंद्र व राज्य सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर, लिंगायत समाजाला त्यांच्या मागणीनुसार आरक्षण द्यावे. 8) केंद्राने साखरेचा किमान विक्री दर 39 रूपये करावा. इथेनॉलचे दर सी हेव्ही मोलॅसिस 60 रूपये, बी व्ही 71 रूपये व सिरपपासून 75 रूपये करण्यात यावे. तसेच नाबार्डने साखर कारखान्यांना साखर तारण कर्ज 4 टक्के व्याज दराने थेट देण्यात यावे. 9) राज्यातील प्रत्येक कारखान्याने प्रत्येक महिन्याला साखर व उपपदार्थ विक्री किती व काय दराने केली हे ऑनलाईन जाहीर करण्याची सक्ती साखर आयुक्त कार्यालयाने करावी. तसेच काटामारीवर आळा घालण्यासाठी कारखानानिहाय हंगामाअखेर 500 टनापेक्षा जास्त उस पुरवठा करणान्या शेतकर्‍यांची नावे जाहीर करावीत. 10) रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उसातून तयार होणार्‍या उपपदार्थातील साखर, बगॅस, मळी, प्रेसमड, यांचे उत्पन्न आर.एस. एफ. सुत्रामध्ये धरण्यात आले आहे. इथेनॉल, को-जन स्पिरीट, अल्कोहोल, या उपपदार्थातील हिस्सा आर.एस.एफ. सुत्रातील 70:30 च्या सुत्रानुसार शेतकर्‍यांना यावा. 11) चालू गळीत हंगामासाठी एकरकमी 3500 रूपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी.

Back to top button