फडणवीसांचे ‘भार’नियमन; काही खाती इतरांकडे जाणार

फडणवीसांचे ‘भार’नियमन; काही खाती इतरांकडे जाणार

[author title="गौरीशंकर घाळे" image="http://"][/author]

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खाते वगळता इतर खाती ही भाजपच्या अन्य मंत्र्यांकडे किंवा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजपच्या नव्या मंत्र्यांकडे दिली जाण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्यावरील सरकारचा भार हलका करणे आणि प्रदेश भाजपमध्ये सामूहिक नेतृत्व आणणे, असे दोन उपाय शोधण्यापर्यंत भाजप श्रेष्ठी पोहोचले असून, मंगळवारी दिल्लीत होणार्‍या कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेसाठीही चर्चा होेऊ शकते.

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा दारुण पराभव झाल्याने फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून संघटनात्मक कामाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मोठे फेरबदल करण्यापेक्षा फडणवीसांनी आता सरकारमध्येच राहावे, मात्र काही मोठ्या खात्यांचा आणि विविध जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदांचा भार कमी करावा. ती खाती अन्य नेत्यांकडे सोपविण्याचा तोडगा कोअर कमिटीच्या बैठकीत काढला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मंगळवारी होणार्‍या या बैठकीला महाराष्ट्रातून स्वत: फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित असतील. नवनियुक्त प्रभारी, सहप्रभारी देखील या बैठकीत सहभागी असतील.

लोकसभेच्या निकालांनी भाजपला धक्का बसला असला तरी ऐन निवडणुकांच्या तोंडावर मोठे फेरबदल करण्यास पक्षनेतृत्व अनुकूल नाही. शिवाय, महाराष्ट्रातील राजकीय स्थिती समाधानकारक नसल्याने भाजप मधील इतर नेतेही तूर्तास ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे या कोअर कमिटीच्या बैठकीत फार मोठे फेरबदल होण्याची शक्यता कमी आहे.

फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली असली तरी तो स्वीकारला जाण्याची शक्यता कमी आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह खात्यासोबत जलसंपदा, विधी आणि न्याय, ऊर्जा, राजशिष्टाचार या खात्यांसोबत नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गड चिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. सरकारमधून पूर्णपणे बाहेर न पडता काही खाती कमी करावीत. विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री पदांचा भारही कमी करावा आणि सोबतच पक्ष संघटनेतील कामे पाहावीत, असा फॉर्म्युला फडणवीस यांच्यासाठी नक्की केला जाण्याची शक्यता आहे.

मंगळवारच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडील जबाबदार्‍यांबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी

गेले काही दिवस राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. पुढील आठवड्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विस्तार झाल्यास ही खाती नव्याने इतर मंत्र्यांकडे दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या विस्ताराची कोणतीही खात्री नाही, असे भाजपच्या उच्चस्तरीय सूत्रांनी
दै. 'पुढारी'ला सांगितले.

तावडे राज्यात सक्रिय

आता 'ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र' अशी घोषणा करणारे भाजप नेते विनोद तावडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले असून, प्रदेश पदाधिकार्‍यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर आता तावडे यांनी विधान परिषद निवडणुकांसाठीही बैठका घेतल्या. त्यामुळे तावडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे मानले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news