रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी औषध विकसित

रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी औषध विकसित

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रेडिओथेरपीनंतर या रुग्णांना होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी क्टोसाइट नावाचे औषध विकसित केले गेले आहे. हे औषध अणुऊर्जा विभाग (डीएई), भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीआरएस लॅबने विकसित केले आहे. या औषधाची फेज-2 क्लिनिकल चाचणी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे.

टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, सध्या क्टोसाईट ही टॅब्लेट फूड सप्लिमेंट म्हणून वापरली जाणार आहे. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.

चाचणीचे निष्कर्ष आशादायी

अ‍ॅक्ट्रेकचे वरिष्ठ डॉक्टर विक्रम गोटा यांच्या मते, या औषधाची फेज-2 क्लिनिकल चाचणी सुरू आहे. कर्करोगाच्या 24 रुग्णांवर क्लिनिकल चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कधी कधी काही रुग्णांमध्ये दुष्परिणाम इतके गंभीर होतात की, मूत्राशय काढून टाकण्याची गरज भासते. परंतु या औषधाचा प्रभाव इतका होता की, मूत्राशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज लागणार नाही. त्याचा परिणाम या रुग्णांवर किती काळ टिकतो याची सध्या तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय डोके आणि मानेचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग इत्यादी कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ही टॅब्लेट किती प्रभावी आहे. याचीही चाचपणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकेल.

एक डोस 175 रुपयांचा

सध्या या औषधाच्या एका दिवसाच्या कोर्सची किंमत, जी फूड सप्लिमेंट म्हणून वापरली त्याची 140 ते 175 रुपये आहे. सध्या डॉक्टर दिवसातून एक गोळी वापरण्याची शिफारस करत असून ही टॅब्लेट जेवणाच्या एक तास आधी घ्यावी लागते. डॉक्टरांनी असेही सांगितले की, हे औषध फक्त रेडिओथेरपी दरम्यान वापरले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news