राज्यभरात अमली पदार्थांची पाळेमुळे | पुढारी

राज्यभरात अमली पदार्थांची पाळेमुळे

सुनील कदम

कोल्हापूर :  1970 च्या दशकात झिनत अमानने ‘दम मारो दम’ म्हणत महाराष्ट्राला खर्‍या अर्थाने ओळख करून दिली, ती गाण्यापुरतीच मर्यादित होती. पुढे जाऊन ड्रग्जचे हे फॅड उभ्या महाराष्ट्राच्या नाकात दम आणेल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण, आजकाल राज्याच्या महानगरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत फोफावत चाललेले लोण चिंताजनक स्वरूपाचे आहे. राज्यातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारी मालिका आजपासून…..

महाराष्ट्राला मागील पंधरा-वीस वर्षांत अमली पदार्थ म्हणजे दारू, गांजा आणि फार फार तर अफू यांचीच ओळख होती; मात्र अलीकडे हेरॉईन, ब्राऊन शुगर, सिंथेटिक ड्रग्ज, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन, कॅथिनॉन या अमली पदार्थांची नावे युवापिढीच्या तोंडातून सहज निघताना दिसत आहेत. अनेकांनी कधी ना कधी त्याची चवही चाखून बघितलेली आहे; तर कित्येकांच्या जिभेवर या अमली पदार्थांची चव रेंगाळताना दिसतेय. काहीजणांना या डर्टी ड्रग्जने पुरते घेरून टाकले आहे, या ड्रग्जच्या नशेबाजीत अनेकांच्या आयुष्याची वाताहत झालेलीही दिसत आहे.

महाराष्ट्रात सर्वात आधी ड्रग्जचा शिरकाव कुठून झाला असेल, तर तो बॉलीवूडमधून आणि त्यानंतर काही परदेशी विद्यार्थ्यांकडून! चित्रपटांच्या निमित्ताने जगभर फिरणार्‍या बॉलीवूडमधील बहुतांश कलाकारांना फार पूर्वीपासूनच ओळख आहे. मात्र, महानगरांमधील युवापिढीत ड्रग्जची पाळेमुळे रुजविण्याचे काम मात्र काही परदेशी आणि परप्रांतीय विद्यार्थ्यांनीच केल्याचे अनेकवेळा चव्हाट्यावर आलेले आहे. ड्रग्जची नशा आजकाल केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ग्रामीण भागातही या डर्टी ड्रग्जने चांगलाच शिरकाव केल्याचे दिसत आहे.

साधारणत: दहा वर्षांपूर्वी सांगलीतील एका उद्योजकाकडे केटामाईनचा मोठा साठा आढळून आला होता; मात्र हा काय पदार्थ आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो, हेच फारसे कुणाला माहीत नव्हते. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे दरम्यान पोलिसांनी एका कारमधून मॅफेड्रॉन नावाच्या अमली पदार्थाचा 50 किलोे साठा जप्त केला होता. ही तोपर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई होती आणि 50 किलोचा साठाही पहिल्यांदाच मिळून आला होता. त्यावेळी त्याची किंमत होती तीस कोटी रुपये होती. त्यानंतर काही दिवसांतच इस्लामपूर येथील एका गोदामातून 340 किलोचा मॅफेड्रॉनचा साठा जप्त करण्यात आला होता. सातार्‍यानजीक तर चक्क एका पोलिसाकडेच ड्रग्जचा मोठा साठा आढळून आला होता. दरम्यानच्या काळात कुर्डूवाडी इथेही मॅफेड्रॉनचा 500 किलो साठा आढळून आला होता. या महिन्यात तर पोलिसांनी नाशिक, पुणे आणि सोलापूर भागातून टनाच्या हिशेबात ड्रग्जचे साठे जप्त केले. या दरम्यान ड्रग्ज तयार करणारे काही कारखानेच उघडकीस आले. वरील सर्व प्रकरणांच्या चौकशीतून पुढे आलेली विशेष बाब म्हणजे अमली पदार्थांचा हा सगळा साठा महाराष्ट्रातीलच वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येणार होता. राज्यातील युवापिढीही गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात या अमली पदार्थांच्या आहारी जात असून, मागणी तसा पुरवठा या न्यायाने अमली पदार्थ राज्यभरात हातपाय पसरत चालले आहेत, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे.

अमली पदार्थाचे स्वरूप!

नैसर्गिक आणि प्रक्रियाकृत असे अमली पदार्थांचे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक अमली पदार्थांमध्ये प्रामुख्याने अफू, चरस आणि गांजा यांचा समावेश होतो. प्रक्रियाकृत अमली पदार्थांमध्ये प्रामुख्याने हेरॉईन, ब्राऊन शुगर, सिंथेटिक ड्रग्ज, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन, कॅथिनॉन या अमली पदार्थांचा समावेश होतो. या अमली पदार्थांची आजकाल काही देशी उगमस्थाने आढळत असली तरी प्रामुख्याने त्यांची आयात परदेशातून केली जाते. पावडर, गोळ्या, द्रवरूप, वायुरूप आणि इंजक्शनच्या रूपात हे अमली पदार्थ मिळतात. मात्र, त्याच्या किमती चार ते पाच हजार रुपये ग्रॅम अशा असल्याने हे अमली पदार्थ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरतात. पण, उच्चभ्रू वर्गातील अनेक युवक या महागड्या अमली पदार्थांचा शौक करताना दिसतात.

अमली पदार्थाची लक्षणे आणि अवलक्षणे!

या अमली पदार्थांची चटक लागलेली व्यक्ती सुरुवातीला काही दिवस सतत उत्साही दिसते; पण नंतर अवघ्या काही दिवसांतच त्या व्यक्तीची झोप व भूक गायब होते, हाडाची काडे होताना दिसू लागतात, कायम चिडचिड, रागावून कुणावरही भडकणे, सततची डोकेदुखी, अचानक रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप येऊन धाप लागणे आणि अचानकपणे अंग गार पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. या अमली पदार्थांच्या आहारी गेलेली व्यक्ती ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. खिशात पैसे नसतील तर चोरी करतील, मारामारी करतील, खोटे बोलतील, आणखी काही करतील; पण कधी एकदा तो पदार्थ मिळवून त्याची चव चाखू, असे त्यांना होते. अमली पदार्थांच्या आहारी जाणार्‍यांचा शेवट मात्र अतिशय वेदनादायक मृत्यूनेच होतो.

Back to top button