कोल्हापूर : वाठारच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर | पुढारी

कोल्हापूर : वाठारच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

किणी, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगांव येथील सरपंच तेजस्विनी संतोष वाठारकर व उपसरपंच राहुल पोवार यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. आज (दि.२५) झालेल्या सर्वसाधारण सभेत १३ विरुद्ध १ मताने मंजूर झाला. तर ठरावावेळी उपसरपंच अनुपस्थित राहिले. ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी नायब तहसीलदार महेश खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा घेण्यात आली.

फेब्रुवारी २०२१ ला झालेल्या निवडणुकीत वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, उद्योजक शरद बेनाडे, बी.एस.पाटील यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान युवा शक्तीचे ८, नानासो मस्के,सूर्यकांत शिर्के, सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखालील संत गोरोबाकाका कुंभार पॅनेलचे ६ तर वाठार विकास आघाडीच्या तेजस्विनी वाठारकर या एकमेव सदस्या निवडून आल्या. त्यांनी जय हनुमान युवा शक्तीला पाठिंबा दिला. योगायोगाने अनुसुचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने वाठारकर सरपंचपदी विराजमान झाल्या. तर राहुल पोवार उपसरपंचपदी निवड झाली.

अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे आदी कारणास्तव १५ पैकी १३ सदस्यांनी सरपंच तेजस्विनी वाठारकर व उपसरपंच राहुल पोवार यांच्या विरोधात हातकणंगले तहसीलदार यांचेकडे अविश्वास ठराव पाठविला होता. या अगोदरच राहुल पोवार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर चर्चा करणेसाठी विशेष सभा घेण्यात आली.सरपंचासह १४ ग्रामपंचायत सदस्य सभागृहात उपस्थित होते.

या सभेत सरपंचाच्या विरोधात सुरेखा मस्के,सुहास पाटील ,सचिन कुंभार, महेश शिर्के,अश्विनी कुंभार ,श्रीमती सुशिला चौगुले,गजेंद्र माळी,सुजाता मगदुम,महेश कुंभार, रूक्साना नदाफ, रेश्मा शिंदे,सचिन कांबळे,नाजुका भुजिंगे या १३ सदस्यांनी हात वर करुन मतदान केले. तर राहुल पोवार बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे १३ विरुद्ध १ मतांनी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला.तर उपसरपंच यांच्या विरोधात १३ विरुद्ध ० मतांनी अविश्वास मंजूर करण्यात आला.संपूर्ण कामकाज अप्पर तहसीलदार महेश खिलारी,ग्रामविकासाधिकारी डी. डी. शिंदे, मंडलाधिकारी अमित लाड आदींनी काम पाहिले.

अडीच वर्षात कोट्यावधीची विकासकामे करूनही काही राजकीय समीकरणासाठी माझ्यावर अविश्वास ठराव आणला गेला.माझ्यावर कोणत्या कारणासाठी हा ठराव आणला गेला याचा भांडाफोड लवकरच जनतेसमोर करणार
– सौ.तेजस्विनी वाठारकर
माजी सरपंच, वाठार तर्फ वडगाव.

अविश्वास ठरावाची कुणकुण लागताच मी १६ तारखेला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.या राजीनाम्याचे अवलोकन २३तारखेच्या ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत अवलोकन करण्यात आले आहे.तरीही राजकीय स्वार्थापोटी प्रशासनास हाताला धरून माझ्यावर अविश्वास ठराव आणून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. याविरोधात मी योग्य त्या न्यायालयात दाद मागणार आहे.
– राहुल पोवार, माजी उपसरपंच वाठार तर्फ वडगाव

हेही वाचलंत का?

Back to top button