कोल्हापूर : मोरपिसावर रेखाटले महालक्ष्मीचे चित्र; पेठ वडगावच्या कलाशिक्षकाची दसरा निमित्त विशेष कलाकृती | पुढारी

कोल्हापूर : मोरपिसावर रेखाटले महालक्ष्मीचे चित्र; पेठ वडगावच्या कलाशिक्षकाची दसरा निमित्त विशेष कलाकृती

किणी; राजकुमार चौगुले : पेठ वडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूलचे कलाशिक्षक संतोष बबन कांबळे यांनी विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने मोरपिसावर करवीर निवासिनी महालक्ष्मीची कलाकृती साकारली असून त्यांनी हे चित्र महालक्ष्मी चरणी अर्पण केले.

कलाशिक्षक असणारे संतोष कांबळे यांनी अनेक देव देवतांची चित्रे आपट्याच्या पानावरती देखील रेखाटली आहेत. दसऱ्याच्या सणासाठी आपट्याची पानं आपण सोनं म्हणून भेट देत असतो परंतु याच पानांना या कलाकृतीमुळे सोन्याची झळाली निर्माण करण्याचं काम कलाशिक्षक कांबळे यांनी केले आहे. दसरा या सणाच्या निमित्ताने मोर पंखावरती एक नवा प्रयोग म्हणून कांबळे यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेचे चित्र रेखाटन करून यशस्वी करून दाखवले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने शाळेच्या फलकावरती महालक्ष्मीची कलाकृती त्यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून सुद्धा साकारलेली आहे.

माध्यम कोणतेही असू दे कॅनव्हास, कागद, पान, खडू मोरपीस यावरती अगदी सहजपणे आपली कलाकृती रेखाटण्यात हातखंडा असणारे संतोष कांबळे परिसरात एक उत्कृष्ट कलाकार उत्कृष्ट चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने कलाशिक्षक संतोष कांबळे यांनी सिंगल कलर टोन मध्ये अवघ्या २ तासात शाहू महाराजांचे हुबेहूब चित्र रेखाटले होते.

खडू शिल्पकलेमध्ये मायक्रो आर्टिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे अगदी अर्ध्या इंचाच्या कडू मध्ये सुद्धा त्यांनी विविध कलाकृती कोरलेल्या आहेत, आंघोळीच्या साबणामध्ये देव देवता महापुरुष यांची सुद्धा शिल्प कोरलेली आहेत.

मोर पंखावरती चित्र रेखाटत असताना अनेक अडचणी येतात कारण पृष्ठभाग हा सपाट आणि सरळ नसतो अनेक तंतुनी विखुरलेला पंख आणि त्यावरती कलाकृती सादर करताना एकाग्रता खूप महत्त्वाची असते अक्रॅलीक रंगाच्या माध्यमातून अवघ्या काही तासातच महालक्ष्मी मातेची हे चित्रकृती निर्माण करून कलाकार म्हणून मी महालक्ष्मी चरणी आपली कला सादर केलेली आहे.
-संतोष कांबळे, कलाशिक्षक ,श्री बळवंतराव यादव हायस्कुल, पेठवडगाव

Back to top button