आजऱ्यातही बनावट सोने तारण ठेवून कर्ज लाटणाऱ्यांची वक्रदृष्‍टी | पुढारी

आजऱ्यातही बनावट सोने तारण ठेवून कर्ज लाटणाऱ्यांची वक्रदृष्‍टी

सोहाळे : सचिन कळेकर बनावट सोने तारण ठेवून कर्ज लाटणाऱ्यांची वक्रदृष्टी आजऱ्यावर पडली आहे. सोने तारण कर्जाच्या प्रक्रियेत सराफाची भुमिका महत्वाची असते. मात्र केवळ नजरअंदाज घेऊन दागिन्यांचे मुल्यांकन (व्हॅल्युएशन) ठरवण्यापर्यंतच त्यांना अधिकार आहेत. दागिन्यांच्या घाकामाचे अथवा दागिन्यातील तुकडा काढून गाळण्याचा अधिकार नसल्याने याचा फायदा फसवणूक करणारी टोळी घेत आहे. आजरा शहरातील एका फायनान्स कंपनीमध्ये अशाच प्रकारे बनावट सोने तारण ठेवून तब्बल 21 लाख 17 हजार रूपयांपर्यंत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरामुळे फायनान्स कंपन्यांसह, बँका, पतसंस्थांसह सराफांचे धाबे दणाणले आहेत.

बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या सोने तारण देण्यापुर्वी नेमलेल्या सराफांकडून सोन्याची शुध्दता तपासून घेतात. मात्र अलिकडच्या काळात फसवणूक करणाऱ्या टोळींकडून नामीशक्कल लढवल्याचे दिसून येते. दागिन्यातील केवळ फासा सोन्याचा ठेवून त्यावर हॉलमार्कचा शिक्का मारल्याचे दिसते. उर्वरित दागिने केवळ सोन्याचा मुलामा लावून बनावटगिरी केली जात आहे. यामध्ये केवळ नजर अंदाज बांधून सराफ सोन्याची शुध्दता किती हे अंदाजे बँका, फायनान्स कंपन्या व पतसंस्थांना कळवतात व त्यावर संस्था कर्जदाराला सोन्याच्या सुमारे 70 ते 80 टक्के कर्ज देवून 10 ते 14 टक्क्यापर्यंत आकारणी करतात. त्यातच तारण सोन्यावर हॉलमार्कचा शिक्का असल्यामुळे सोने शुध्द असल्याबाबत प्राथमिक मत तयार होते.

सोने कट केले अथवा सोने गाळले तरच त्याच्या शुध्दतेची नेमकी स्थिती लक्षात येते, पण हेच करण्याचा अधिकार सराफांना नसतो. त्यामुळे बनावटगिरी करणाऱ्यांचे फावत आहे. सरफांबरोबर बँकाही कारण नसताना अडचणीत येत आहेत. आजऱ्यातही सध्या असेच प्रकार सुरु आहेत. यापुर्वीही असे प्रकार घडले असून, जवळपास कोटी रूपयांपर्यंत बनावट टोळीने गंडा घातल्याचा बोलबाला आहे. नुकतेच आजरा शहरातील एका फायनान्स कंपनीकडे बनावट सोने ठेवून 21 लाख 17 हजार 380 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे फायनान्स कंपनी, बँका, पतसंस्थांसह सराफांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

काही अधिकार सराफाला नसल्याने नजर अंदाज बांधून सोन्याची शुध्दता ठरवावी लागते. फसवणूक करणारे दागिन्यांचा फासा सोन्याचा ठेवून डिझाईनच्या सोन्याला केवळ सोन्याचा मुलामा दिला जातो. त्यामुळे नेमकी शुध्दता लक्षात येत नाही. फसवणुकीचा प्रकार झाल्यानंतर सराफाला नाहक त्रास होत असल्याने अनेक सराफांसमोर व्हॅल्युएशनचे काम करावे की नको असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा या बनावट सोने तारण ठेवणाऱ्या टोळ्यांमुळे अनेकजण अडचणीत येत असून, पोलीस प्रशासनाने तातडीने अशा टोळींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

सोन्याचे प्रमाण दाखविणाऱ्या मशिन्सचा वापर करण्याची गरज

सध्या कोणत्याही दागिन्यात सोन्याचे प्रमाण किती आहे ते दाखविणाऱ्या मशिन्स उपलब्ध आहेत. सराफांनी अशा मशिन्सचा वापर केल्यास अशा पध्दतीने होणारी फसवणूक टाळता येण्यास मदत होईल.

हेही वाचा : 

Back to top button